Top Newsराजकारण

आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना अटक; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

मुंबई : तब्बल आठ तासाच्या चौकशीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांची आज ईडीकडून चौकशी सुरू झाली. ईडीने ही सकाळीच नवाब मलिक यांच्या घरी धडक दिली होती. ही बातमी बाहेर येताच सकाळीच राज्यात खळबळ उडाली. नवाब मलिक हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले होते. मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले मलिक हे दुसरे मंत्री आहेत.

दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात नवाब मलिक यांचाही सहभाग असल्याचा पुरावे सापडले असल्याचे सूत्रांनी सांगितले. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ईडी अधिकारी मलिक यांचे घरी दाखल झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांच्या भावाला ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र, मलिक यांना समन्स देण्यात आले नव्हते.

लढेंगे और जितेंगे अटकेनंतर नवाब मलिकांची प्रतिक्रिया

नवाब मलिक हे तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांना व्हिक्टरी साईन दाखवली. लढेंगे आणि जितेंगे डरेंगे नही, असं नवाब मलिक यांनी माध्यमांना सांगितलं आहे. नवाब मलिक यांचं जेजे रुग्णालयात अर्धा तास मेडिकल होईल. त्यानंतर न्यायालयात सुनावणी होईल, अशी माहिती आहे.

ईडीला सरकार स्थापन करायचे असेल तर शिवाजी पार्कात या, यशोमती ठाकूर यांची उपरोधिक टीका

ईडीला सरकार बनवायची घाई झाली असेल तर त्यांनी शिवाजी पार्कात यावे, अशी उपरोधिक टीका राज्याच्या बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी ईडीच्या कारवाईवर टीका केली आहे.

यशोमती ठाकूर यांनी म्हटले की, ‘ईडी’ला जर सरकार बनवायची घाई लागली असेल तर या, शिवाजी पार्कात या ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने आम्ही १७० जणं एकत्र भेटू. आणि एक सांगते, कदाचित तुमचं काम संपेपर्यंत १७० चा आकडा आणखी वाढलेला असू शकतो, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. ईडीच्या कारवाईमुळे महाविकास आघाडीची एकजूट तुटणार नाही. या उलट ती आणखी मजबूत होतेय असेही त्यांनी म्हटले.

ईडी नव्हे भाजपला टोला?

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील केंद्र सरकारकडून राज्य सरकार पाडण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून सातत्याने केला जातो. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापरही त्याच कारणाने होत असल्याचाही आरोप करण्यात येतो. यशोमती ठाकूर यांनी ट्वीट ईडीला उद्देशून केले असले तरी हा टोला भाजपला होता अशी चर्चा सुरू आहे.

नवाब मलिक यांची २० वर्षांनी का चौकशी केली जातेय? संजय राऊतांचा सवाल

केंद्रीय तपास यंत्रणांची पोलखोल आपण करत राहू, तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारही समोर आणू, त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, नवाब मलिक यांची २० वर्षांनी का चौकशी केली जातेय? असा सवालही यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

…म्हणून ईडीची कारवाई, रोहीत पवार यांचा हल्लाबोल

नवाब मलिक यांनी महाराष्ट्रातील ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणलं आहे, भाजपचे काही पदाधिकारी उघडकीस आणले आहेत. इथं उघड झालेलं रॅकेट गुजरातपर्यंत जाईल असं वाटलं असेल, त्यामुळे कारवाई झाली असेल असे रोहित पवार म्हणाले. गुजरातमध्ये देखील २२ हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचे ड्रग सापडले असेे पवार म्हमाले.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी

नवाब मलिक यांच्या अटकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत असून त्या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.

नवाब मलिक राजीनामा देण्याची शक्यता

दाऊद इब्राहिमशी संबंधित जमिनीचा व्यवहार प्रकरणी ईडीने राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता नवाब मलिक आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. नवाब मलिक आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सोपवण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यालयात वरिष्ठ मंत्र्यांची बैठक सुरु आहे. यामध्ये नवाब मलिकांना ईडीकडून अटक करण्यात आलेल्या अटकेवर यामध्ये चर्चा सुरू आहे. डीकडून अटक झाल्यानंतर आता विरोधकांकडून नवाब मलिकांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याची शक्यता लक्षात घेता नवाब मलिक राजीनामा देण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मंत्रालयात राष्ट्रवादीची बैठक सुरू असून यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, राजेश टोपे उपस्थित आहे. नवाब मलिक यांच्या अटक प्रकरणी चर्चा सुरु आहे.

नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील

राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर आता त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसून त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, नवाब मलिकांच्या अटकेनंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती आहे.

करावे तसे भरावे; मलिकांच्या अटकेनंतर दरेकरांची प्रतिक्रिया

या देशात कायदा सर्वश्रेष्ठी आहे. कायद्यासमोर आमदार, खासदार कोणीही मोठा नाही. हे या ठिकाणी पुन्हा एकदा कायद्याने दाखवून दिलं आहे, कायदा हातात घेण्याचा अधिकार आपल्याला नाही. आणि सत्ताधारी पक्षाला तर नाहीच नाही. जर नवाब मलिक यांचा संदर्भ ईडीच्या कुठल्या विषयात असेल तर त्याठिकाणी चौकशी करून तपासणे हा त्यांचा कामाचा भाग आहे, आणि ईडी विनाकारण अटक करत नाही. अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून हे बेकायदेशीर आहे असं सांगत विरोध करण्यात आला. त्यावर उत्तर देताना, हे बेकायदेशाीर नसून न्याययंत्रणा आहे,. कोर्टामध्ये बेकायदेशीर असल्यास त्यांनी कोर्टात सांगावं. सर्व गोष्टी न्याययंत्रणेच्या माध्यमातूनच होतील असे दरेकर यावेळी म्हणाले.

ईडी आणि भाजप एकच, आम्ही छत्रपतींचे मावळे झुकणार नाही : सुप्रिया सुळे

मनी लाँड्रिंग प्रकरणी तब्बल आठ तासाच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. यावरूनच आता महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीचे अनेक नेते आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. अशातच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘भाजप आणि ईडी हे एकच असून ते एकत्र काम करतात’, अशी प्रतिक्रिया त्यांनी बोलताना दिली. आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत झुकणार नाही, असा थेट इशारा त्यांनी भाजपला दिला आहे.

आता नंबर अनिल परब यांचा असेल, किरीट सोमय्या

अनिल देशमुखनंतर आता नवाब मलिक आणि तिसरा नंबर अनिल परब यांचा लागणार आहे. उद्धव ठाकरे यांनी कितीही दादागिरी केली तरी आम्ही सोडणार नाही. महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button