राजकारण

ओडिशा विधानसभेत भाजपा आमदाराचा आत्महत्येचा प्रयत्न

भुवनेश्वर : धान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याच्या विरोधी पक्षाच्या आरोपाला ओडिशा विधानसभेत गंभीर वळण आले. या प्रश्नावर सरकारच्या भूमिकेचा निषेध करत ओडिशा विधानसभेत (Odisha Assembly) भाजप आमदार सुभाष चंद्र पाणिग्रही (Subash Chandra Panigrahi) यांनी सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

ओडिशाचे अन्न आणि खाद्य पुरवठा मंत्री आर.पी. स्वॅन (Ranendra Pratap Swain) हे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारतर्फे निवेदन वाचत असताना त्यांनी हा टोकाचा प्रयत्न केला. पाणिग्रही यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यांची तब्येत आता ठीक आहे.

ओडिशातील धान उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा भाजपा आणि काँग्रेस या विरोधी पक्षांनी विधानसभेत लावून धरला आहे. त्यांच्या आक्रमक पावित्र्यामुळे विधानसभेचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले. संध्याकाळी चार वाजता विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरु झाले. त्यावेळी अन्न मंत्र्यांनी निवेदन वाचण्यासाठी सुरुवात केली. त्यावेळी पाणिग्रह त्यांच्या जागेवर उभे राहिले. त्यांनी सॅनिटायझरची बाटली खिशातून काढली आणि पिण्याचा प्रयत्न केला.
भाजपा आमदार कुसूम टेटे यांनी सुरुवातीला त्यांना अडवलं देखील, त्यानंतर विधीमंडळ कामकाज मंत्री बीके अरुख आणि प्रमिला मलिक यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पाणिग्रही यांच्या हातामधून सॅनिटायझरची बाटली हिसकावून घेतली.

पाणिग्रही यांनी यानंतर बोलताना सांगितले की, ‘मी या विषयावर यापूर्वीच आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतरही सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही. बाजारपेठेतील भावामध्ये धान्य विकण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये हा प्रश्न गंभीर आहे. या प्रश्नावर आत्महत्या करण्याचा इशारा काही जणांनी दिला आहे. त्यामुळे मी विधानसभेत सॅनिटायझर पिण्याचा निर्णय घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button