अर्थ-उद्योगराजकारण

व्याजदराचा निर्णय फिरवल्याबद्दल सुप्रिया सुळे यांच्याकडून केंद्रीय अर्थमंत्र्यांचे अभिनंदन

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत छोट्या बचत योजनांवरील व्याज कमी करण्यात आल्याची घोषणा बुधवारी रात्री करण्यात आली होती. त्यामुळे कोट्यवधी गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला होता. परंतु गुरुवारी सकाळी हा निर्णय मागे घेण्याची अधिकृत घोषणा सीतारमण यांनी केली. त्यामुळे व्याजदर हे जैसे थे राहतील. अल्प बचत योजनांवरील (Small Savings Scheme) व्याज दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने अवघ्या काही तासात मागे घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांचे आभार व्यक्त केले. सोबतच इंधन आणि गॅस दरवाढही मागे घेण्याची विनंती सुप्रिया सुळेंनी केली.

अल्प बचतीवरील व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय सरकारने तातडीने फिरविला. सरकारचे याबद्दल अभिनंद. यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला. आता केंद्र सरकारने अशीच तत्परता पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस यांवर लादलेली मोठी दरवाढ देखील तात्काळ मागे घ्यावी ही विनंती, असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

केंद्र सरकारच्या अल्प बचत योजनांचे व्याज दर 2020-2021 च्या शेवटच्या तिमाहीत (मार्च 2021 पर्यंत) असलेल्या दरानुसारच राहतील. या योजनांमध्ये किसान विकास पत्र (KVP), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि सुकन्या समृद्धी योजना यांचा समावेश आहे.

अल्प बचत योजनांचे नवीन व्याजदर तीन महिन्यांनी सरकारकडून बदलले जातात. बर्‍याच वेळा असे घडते की, जुने व्याज दरच कायम ठेवले जातात. यंदा व्याजदरामध्ये मोठा बदल करण्यात आला होता. 2020-21 आर्थिक वर्षातील शेवटची तिमाही संपल्यामुळे 31 मार्चला नवीन व्याजदर जाहीर करण्यात आले होते, परंतु एक एप्रिलला हे दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय झाला.

दरम्यान, वित्त मंत्रालयाच्या नजरचुकीचे अजिबात नवल वाटले नाही. पण वित्त मंत्रालय नेमक कोण चालवतय? आणि या मंत्रालयाने शेवटचा कोणता निर्णय विचारपूर्वक घेतला होता? नोटाबंदी, जीएसटीची अंमलबजावणी की कोरोना संदर्भातील आर्थिक पॅकेज? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button