मुंबई : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही केवळ अतिवृष्टी नाही तर अनपेक्षित संकट असल्याचं म्हटलं आहे. गेले चार ते पाच दिवस संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहे, असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रालयात जाऊन पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्यातील परिस्थितीचा आढावा मी गेले चार पाच दिवसांपासून घेत आहे. कारण हवामान खात्याने जो काही अंदाज व्यक्त केला होता, त्या अनुषंगाने आपल्याला काही शब्दांची व्याख्या बदलावी लागणार आहे. कारण अतिवृष्टीला काही मर्यादा राहिलेल्या नाहीत, अतिवृष्टीच्या पलिकडे जाऊन वृष्टी होत आहे. अनपेक्षित असं हे संकट आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. दरडी कोसळत आहेत, पुराचं पाणी वाढत आहे, नद्या फुगत आहेत. या सगळ्या संकटाला आपण सामोरे जात आहोत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन आला होता. त्यांनीसुद्धा सर्वोतपरी सहकार्य करण्याचं वचन दिलं आहे, असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, कोस्ट गार्ड…एनडीआरएफच्या टीम बचाव कार्य करत आहेत. बचावकार्य सुरु झालेलं आहे. पाऊस काही ठिकाणी थांबतोय तर काही ठिकाणी पडतोय. धरणं आणि नद्या या ओसंडून वाहत आहेत. काही ठिकाणी धरणाचं पाणी सोडावं लागत आहे आणि ते कुठं जाईल ते लक्षात घेऊन तिथल्या नागरिकांना स्थलांतरित करण्याचं काम जोराने सुरु आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, हे सगळं करत असताना कोरोनाचं सुद्धा संकट टळलेलं नाही आणि याचीही कल्पना आपल्याला आहे. हाच तो परिसर आहे जिथे कोरोनाचं संकट आपल्याला चिंताजनक वाटतंय. अशा वेळेला पहिल्या प्रथम जिवीत हानी होऊ न देणं हे महत्त्वाचं काम आहे त्याचा प्रयत्न सुरु आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दुर्दैवाने तळई गावात दरड कोसळल्याने काही जणांना काल वाचवू शकलो. पण आतापर्यंत ३०-३५ लोकं दुर्दैवाने मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे. अजून तिथे काम सुरु आहे. काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत, तिथे देखील प्रयत्न सुरु आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
कोविड रुग्णांची काळजी घ्या
पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांमध्ये कोविड संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. त्यात ही आपत्ती आल्याने कोविड रुग्णांची असुविधा होऊ देऊ नका असे सांगून ते म्हणाले की, आरोग्याचे नियम पाळून, विशेषत: मास्क घालून बचाव कार्यातील लोकानी काळजी घ्यावी.