Top Newsआरोग्य

राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाउन कायम; काही जिल्ह्यांमधील निर्बंध आणखी कडक होणार

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण आणण्यात यश मिळतंय. मात्र, पुढचे १५ दिवस राज्यात निर्बंध कायम राहणार आहेत. १५ जूनपर्यंत राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यात येत आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील करोना परिस्थिती, लॉकडाऊन व तौक्ते चक्रीवादळामुळं झालेल्या नुकसानीचा आढावा यासंदर्भात राज्यातील जनतेला माहिती दिली आहे. तसंच, करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे.

राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण काहीसे कमी झाल्याचे दिसत असले, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही वाढ सुरूच आहे. तर, राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा कालावधी उद्या संपणार आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. ‘ब्रेक दि चेनचे’ आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. ”जनतेवर निर्बंध लादावे लागतात या सारखं दुसरं कटू काम नाही, असं मला वाटत नाही. पण ते मला नाईलाजाने करावं लागत आहे. आपल्या राज्याच्या व सर्वांच्या जीवाच्या काळजी पोटी करावं लागत आहे, असं मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं.

सुरूवातीला त्यांनी, जिद्दीनं आणि निश्चयानं बंधनं पाळल्याबद्दल धन्यवाद.. असं म्हणत जनतेचे आभारही मानले. याचबरोबर, आता आपण निर्बंध लावत आहोत, पण कडक लॉकडाउन केलेला नाही. असंही ते म्हणाले. याशिवाय, तौते वादळग्रस्तांना मदत देण्यास सुरूवात होत असल्याचंही सांगितलं.

यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, काहीजण असं म्हणत आहेत की लाट आता ओसरत आहे, मग आता काय करणार हे निर्बंध उठवणार का? याबाबत देखील तुम्हाला माहिती देण्याची आवश्यकता वाटते, की नेमकं आपण कुठं आहोत? आज राज्यात १८ हजारांच्या आसपास रूग्ण संख्या आहे. मात्र दोन-चार दिवसांअगोदरचा आकडा पाहिला तर, गेल्या लाटेत जी सर्वोच्च संख्या होती. तिच्या तुलनेत आता थोडीशी कमी होते आहे. त्यावेळी आपण जे शिखर गाठलं होतं. ते सणासुदीच्या नंतर गाठलं होतं. यंदा ही परिस्थिती सणासुदीच्या अगोदर आलेली आहे. १७ ते १९ सप्टेंबर २०२० मध्ये राज्यात साधारण एका दिवसात आढळणारी रूग्ण संख्या ही २४ हजार होती. आता २६ मे रोजी २४ हजार ७५२ एवढे रूग्ण आढळलेले आहेत. आज साधारण ही संख्या १८ हजारापर्यंत आली आहे. म्हणजे अजूनही आपण म्हणावं तेवढं खाली आलेलो नाही. मात्र दिलासादायक बाब म्हणजे यावेळी रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२ टक्क्यांवर आहे. त्यामुळे आता आपण निर्बंध लावत आहोत, पण कडक लॉकडाउन केलेला नाही. मात्र आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रूग्ण संख्या थोडीशी वाढताना दिसत आहे. ही जरा काळजीची बाब आहे. कारण, शहरी भागात हे प्रमाण कमी होताना दिसत असलं तरी ग्रामीण भागात हे प्रमाण वाढताना दिसत आहे. हे ताबतोब थांबणं आवश्यक आहे.

ही दुसरी लाट ही अपेक्षेपेक्षा फार मोठी होती. या लाटेत अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावलेले आहेत. यापुढे मात्र असं होऊ देता कामानये. करोनामुळे पालक गमावलेल्या बालकांच पालकत्व राज्य सरकार घेणार. त्यांना आम्ही अनाथ होऊ देणार नाही. याबाबत योजना तयार केली जात असून, लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल. राज्यातील निर्बंध नाइलाजाने पुढील १५ दिवस म्हणजे १५ जूनपर्यंत वाढवावे लागत आहे. नुसते निर्बंध वाढवत नाही आहोत, तर आता आपण जिल्ह्यानुसार आढावा घेऊन, काही जिल्ह्यांमध्ये हे निर्बंध कदाचित कडक करावे लागतील, तर काही जिल्ह्यात हे निर्बंध आपण थोडेफार शिथील करू शकू.

दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात मोर्चे, समारंभ टाळा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. दुकानं उघडा किंवा सेवा सुरु करा यासाठी रस्त्यावर उतरु नका. करोना योद्धे म्हणून रस्त्यावर उतरा. करोनाची लाट ही सरकारी योजना नाही. तिच्या विरोधासाठी तुम्ही रस्त्यावर उतरत आहे. हा गैरसमज मनातून काढून टाका. निर्बंध आपण उठवणार आहोत. पण निर्बंध उठवताना घरातील कर्ता गमवला आहे. त्याकडेही आपल्याला लक्ष द्यायचे आहे. रत्त्यावर उतरु नका तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button