Top Newsराजकारण

‘जलयुक्त शिवार’ला क्लीन चिट; फडणवीसांना अतिशय आनंद !

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार योजनेवर महाविकास आघाडी सरकारनं गंभीर आरोप केले होते. इतकंच नाही तर या योजनेची खुली चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी एक समितीही नेमण्यात आली होती. मात्र, या समितीकडून आता जलयुक्त शिवार योजनेला क्लीन चिट देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या जलसंधारण विभागानं हा अहवाल दिलाय. या अहवालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मला अतिशय आनंद होतोय, अशी प्रतिक्रिया दिलीय.

‘मला अतिशय आनंद होतोय. कारण ही जनतेची योजना आहे, जनतेने राबवलेली योजना आहे. यापूर्वी माननीय उच्च न्यायालयाने एक तज्ज्ञ समिती नेमली होती. देशभरातील तज्ज्ञ त्यात होते. त्या समितीने ही योजना कशी योग्य आहे आणि कसं योग्य काम यात झालं आहे, असा एक अहवालही त्या समितीने दिला होता. तो अहवालही उच्च न्यायालयाने स्वीकारला होता. त्यामुळे आता हा जो अहवाल आला आहे, तो त्याला अनुरुप असेल. हे खरं आहे की यात काही तक्रारी असू शकतात, मी स्वत: सांगितलं होतं की ६०० वेगवेगळ्या तक्रारी आहेत, त्याती चौकशी केली जाईल आणि ती चौकशी झाली पाहिजे. मला असं वाटतं की 6 लाख कामांमधील ६०० कामांची चौकशी ही फार मोठी गोष्ट नाही. ज्या चुकीच्या गोष्टी झाल्या असतील त्याचं मी समर्थन करणार नाही. पण त्यामुळे या संपूर्ण योजनेला बदनाम करणं, हे पूर्ण चुकीचं आहे’, असं फडणवीस म्हणाले.

महाविकास आघाडीने आपले दात आपल्याच घशात घातले : शेलार

दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी दिली.

जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली. त्यावेळी या योजनेच्या कामात गुणवता नाही, सिंचन क्षमता वाढली नाही, पारदर्शकता नाही, असे आघाडीकडून आरोप करण्यात आले होते, असं शेलार म्हणाले. मग चौकशी अंती आता तुमच्या जलसंधारण विभागाने काय उत्तर दिली? जलयुक्त शिवारमुळे संरक्षित सिंचनाची व्यवस्था झाली, नगदी पिकांमध्ये शेतकऱ्यांची कमाई वाढली, लागवडीचा क्षेत्रफळ वाढले, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली, यासाठी जी टेक्नॉलॉजी वापरली होती आणि फोटो जीओ मँपिंग केले गेले त्यात गुणवत्ता आणि पारदर्शकता ठेवली गेली, आणि याच्यामध्ये गावकऱ्यांची सहभागिता होती. मग या सगळ्या गोष्टी जलसंधारण विभाग चौकशीअंती बोलत असेल तर केवळ अहंकारापोटी आणि राजकीय द्वेषापोटी तुम्ही या जलयुक्त शिवारला बदनाम केलं हे सिद्ध होते, असंही त्यांनी नमूद केलं. राजकीय द्वेषातून आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अपमान केला, शेतकऱ्यांचे नुकसान केले, आता तुमचेच दात तुमच्या घशात गेले ना? असा सणसणीत टोला शेलार यांनी आघाडी सरकारला लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button