राजकारण

पंकजा मुंडे यांनी मांडलेली भूमिका भाजपचीच : फडणवीस

पुणे: दिवंगत गोपीनाथ गोपीनाथ मुंडे यांनीच आम्हाला घडवलं. मी आणि भागवत कराड आम्ही दोघेही मुंडे साहेबांचेच कार्यकर्ते आहोत, असं सांगतानाच पंकजा मुंडे यांनी आज जी भूमिका मांडली तीच भाजपची भूमिका आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीस आज पुण्यात होते. पुण्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांनी मांडलेल्या भूमिकेचं स्वागत केलं. मी असो की डॉ. भागवत कराड, आम्ही दोघेही मुंडे साहेबांमुळे तयार झालेले कार्यकर्ते आहोत. पंकजाताईंनी मांडलेली भूमिका हीच भाजपाची भूमिका आहे. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि नंतर स्वत: हीच आमची सर्वांची कार्यपद्धती आहे, असं फडणवीस म्हणाले.

ओबीसींच्या प्रश्नांवर आमची लढाई यापुढेही सुरूच राहील. येत्या फेब्रुवारी महिन्यात तीन चतुर्थांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायच्या आहेत. तोपर्यंत सरकारला वेळ काढायचा आहे का, अशी शंका येते, असं सांगतानाच ओबीसी आरक्षणासंदर्भात १३ डिसेंबर २०१९ ते ४ मार्च २०२१ या संपूर्ण कालावधीत राज्य सरकारने काय कारवाई केली, हा प्रश्न विचारला का? कुणी कसेही वागले तरी विचारवंतांवर आम्ही टीका करीत नाही, असं ते म्हणाले. इम्पिरीकल डेटा गोळा करणे हे ४ महिन्यांचे काम आहे. हे काम सहज होऊ शकणारे आहे. मी हेच म्हटले की, जर तुम्हाला जमत नसेल तर मला सूत्र द्या, मी करून दाखवितो. आम्ही जे बोलतो ते करून दाखवितो, असंही ते म्हणाले.

केंद्रात सहकार खाते नव्हते, तर म्हणायचे केंद्र सरकार सहकाराला मारतं आहे. आता ७० वर्षांनी पहिल्यांदा सहकार खाते तयार झाले, तर म्हणतात की, सहकाराचा केंद्राशी काय संबंध?, असा दोन्ही काँग्रेसवर हल्ला चढवतानाच या खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला मोठा लाभ होईल. केंद्रीय मंत्री अमित शाह राजकारणात येण्यापूर्वी सहकारात होते. गुजरातमध्ये सहकारात त्यांनी केलेले काम अतिशय मोठे आहे. त्यामुळे स्वाभाविकच हे खाते त्यांच्याकडे गेले, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button