राजकारण

परमबीर सिंग हे ठाकरे सरकारचे पाप : आशिष शेलार

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आल्यानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय. एक ट्विट करत, हे ठाकरे सरकारचं पाप असल्याचं शेलार म्हणालेत. “एका सामान्य नागरिकाचा खून, एक एपीआयला अटक, त्याच्या गाडीत नोटांची बंडल, नोटा मोजण्याचे मशीन, गाडीत नंबर प्लेटचा खच. त्यावरून मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या. दुर्दैवाने एवढे मुंबई पोलिसांचे खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती. ठाकरे सरकारचे हे पाप आहे!” असं ट्विट शेलार यांनी केलं आहे.

भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बदली करुन काही साध्य होईल असं वाटत नाही, असं म्हटलंय. “पोलिसांचं राजकीयीकरण होणार नसेल, राजकीय नेते आपला सूड घेण्यासाठी पोलिसांचा वापर करणार नसतील तर ही यंत्रणा योग्यरित्या चालेल. राजकीय नेत्यांचा धाक असावा पण दबाव नको. राजकीय नेत्यांचं मार्गदर्शन असावं, पण पोलिसांमार्फत स्वत:चा स्वार्थ साधण्याची वृत्ती नसावी. हेच पोलीस अधिकारी चांगलं काम करु शकतात. जेव्हा तुम्ही त्यांना काम करण्यासाठी चांगलं वातावरण निर्माण करता. अधिकाऱ्यांची अदलाबदल करण्याऐवजी आपण राजकीय नेते म्हणून आपल्यात बदल केला तर पोलीस व्यवस्था उत्तम काम करु शकेल”, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

मुंबई पोलीस आयुक्तांची बदली होणं स्वाभाविक आहे. ज्या प्रकरणात वाझे नावाचा अधिकारी या विषयात सहभागी होता. त्याला कंट्रोल करणार अधिकारी पोलीस आयुक्त होते. त्यामुळे उद्या या प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं तर मुंबई पोलीसांना हा मोठा धक्का असता. त्यामुळे पोलीस आयुक्तांची बदली स्वाभाविक आहे. तसंच पोलीस आयुक्तांची बदली हे आमचं टार्गेट नाही. तर मनसुख हिरेन प्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडल्याचं प्रकरण धसास लागावं हा आमचा हेतू आहे. त्यामुळे आम्ही हे प्रकरण लावून धरलं. याची वस्तुस्थिती जनतेसमोर आली पाहिजे, हे आमचं ध्येय असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय.

मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी
मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाली आहे. त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अटकेत असलेले मुंबई पोलीस दलातील निलंबित API सचिन वाझे यांच्या स्फोटक प्रकरणात महाराष्ट्र पोलीस दलात ही मोठी घडमोड घडली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून परमबीरसिंग यांची उचलबांगडी होणार अशी जोरदार चर्चा होती. ती अखेर खरी ठरली आहे. महत्त्वाचं म्हणजे परमबीर सिंग यांना साईडलाईन करण्यात आलं आहे. त्यांना होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलाचं जबाबदारी देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button