Top Newsराजकारण

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अधोगती; ‘भारत बंद’वेळी नाना पटोलेंचा घणाघात

अकोला : केंद्रातील मोदी सरकारविरोधात आज देशभरात भारत बंद पुकारण्यात आला. त्यात काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष सहभागी झाले होते. अकोल्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं. ‘केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला गेला आहे. शेतकरी, कामगार, कष्टकरी, सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहे. मोदी सरकारचे शेतकरीविरोधी धोरण, कामगारविरोधी धोरण, बेरोजगारांच्या विरोधातील धोरण, गरिबांच्याविरोधातील धोरणांना विरोध करण्यासाठी ही लढाई आहे. सामान्य जनतेला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरुच राहिल’, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय.

केंद्र सरकारविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा देत काँग्रेस पक्षाने सक्रीय भाग घेतला. अकोल्यात नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली. यावेळी नाना पटोले यांनी रिक्षा चालवली. या रॅलीत अकोला शहर जिल्हाध्यक्ष, माजी आमदार बबनराव चौधरी, महापालिकेतील विरोधी पक्षनेते साजीद पठाण, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, तीन कृषी कायद्याविरोधात देशातील शेतकरी आंदोलन करत आहे. एका वर्षापासून हे आंदोलन सुरुच आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांच्या वेदना दिसत नाहीत. कृषी कायदे, कामगार कायद्यात बदल करुन शेतकरी, कामगारांना भांडवलदारांचे गुलाम बनवण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. मोदी सरकराच्या काळात फक्त दोन चार उद्योगपती मित्रांचा फायदा होत असून १३० कोटी जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेलाचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत परंतु मोदी सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत नाही.

अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलताना पटोले म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने लादलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत म्हणून एक वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी वर्षभरापासून ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलनात जवळपास 500 शेतकऱ्यांचे निधन झाले. परंतू केंद्रातील कुंभकर्णी सरकारला मात्र या शेतकऱ्यांचा आवाज ऐकू येत नाही. या काळ्या कृषी कायद्याने देशातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त करुन त्याला भांडवलदाराचे गुलाम बनवण्याचे काम मोदी सरकार करत आहे. कामगार कायद्यात बदल करून कामगारांचे हक्क व अधिकार काढून घेतले आहेत. नवीन कामगार कायदेसुद्धा उद्योगपतीधार्जिणे आहेत. कामगारांना भांडलदारांच्या दावणीला बांधण्याचे पाप केंद्र सरकारने केल्याचा आरोप पटोलेंनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button