Top Newsराजकारण

पुण्यातील मोदी मंदिर हटवलं; महागाई कमी करण्यासाठी राष्ट्रवादीची आरती

पुणे : पुण्यातील औंधमध्ये उभारण्यात आलेलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंदिर हटवण्यात आलं आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर ही मूर्ती हटवण्यात आली आहे. या मंदिरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा शेजारील नगरसेविकेचा कार्यालयात हलविण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नमो प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर मुंडे यांनी औंध भागातील परिहार चौकात मोदी मंदिराची उभारणी केली होती. या मंदिराची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गुरुवारी सकाळी मोदी मंदिराजवळ दाखल झाले होते. पेट्रोल-डिझेलचे वाढते, घरगुती गॅस सिलिंडर, वाढती महागाई कमी करण्यासाठी या मोदी मंदिराकडे साकडं घालायला आलो होतो, असं या कार्यकर्त्यांनी सांगितलं.

देशापुढे असलेले प्रश्न सुटावेत यासाठी आम्ही साकडं घालायला मंदिरात आलो होतो. मात्र भाजपचा देव काही केल्या आम्हाला दिसत नाही आहे. पेट्रोल, डिझेल, सिलिंडरचे दर कमी होऊ दे, यासाठी नवस बोलायला आम्ही इथे आलो. पण देवच दिसत नसल्यानं आम्हाला अगदी भरून आलं, अशी टोलेबाजी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. देव चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पुण्यातील औंध भागामधील मयूर मुंडे या भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतःची मालकी असलेल्या जागेत हे मंदिर उभारले होते. पिंपरी चिंचवड येथील मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी यांनी खास जयपूरमधून मोदींचा पुतळा तयार करुन घेतला आहे. याकरिता १ लाख ६० हजार रुपये खर्च आलेला. १५ ऑगस्ट २०२१ दिवशी औंधमधील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले होते.

राष्ट्रवादीच्या इशाऱ्याने पुतळा हटविला

पुण्यात उभारण्यात आलेल्या मोदी मंदिराची देशभर चर्चा झाली.. मोदीभक्त मयूर मुंडे या भाजपच्या कार्यकर्त्यानं औंध परिसरात मंदिर उभारलं, मात्र मंदिर उभारून दोन दिवस उलट नाही तोच, मोदींचा पुतळा रातोरात हलवण्याची वेळ ओढवली. पुतळा कुणी आणि का नेला असा प्रश्न पोलिसांना पडला. पण सकाळी त्याचं उत्तर मिळालं. इंधनाचे दर कमी करा असं साकडं घालण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोदी मंदिरात दाखल झाले. पण मंदिरात पुतळाच नव्हता. मंदिरातील मोदींचा पुतळा एका नगरसेवकाच्या कार्यालयात नेऊन ठेवल्याचं कळतंय. राष्ट्रवादीच्या आंदोलनाची कुणकुण लागल्यानंच पुतळा हटवण्यात आला असावा अशी चर्चा त्यामुळे सुरू झालीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button