आशिष शेलारांच्या भेटीचा संजय राऊतांकडून इन्कार

मुंबई: भाजप नेते आशिष शेलार यांना भेटल्याच्या वृत्ताचा शिवसेना नेते, खा. संजय राऊत यांनी इन्कार केला आहे. मी काल कुणालाही भेटलो नाही. या सर्व अफवा आहेत. अशा अफवांनी राजकारण हलत नाही. अफवा पसरवण्याचे कारखाने सुरू आहेत. ते दिवाळखोरीत निघतील, असं संजय राऊत यांनी सांगितलं. आमची अशी कोणतीही भेट झालेली नाही आणि जरी भेट झाली असली, तरी त्यात गैर काय? महाराष्ट्राचं किंवा देशाचं राजकारण हिंदुस्थान-पाकिस्तानसारखं नाहीये. पण ज्यांना माझ्यामुळे त्रास होतो, माझ्या लिहिण्या-बोलण्यामुळे त्रास होतो, अशा लोकांकडून अशा अफवा पसरवल्या जातात, मी त्यांचं स्वागतच करतो, असा खोचक टोलाही राऊत यांनी लगावला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते आशिष शेलार काल मुंबईत भेटल्याचं उघड झालं होतं. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याचंही समोर आलं होतं. त्या वृत्ताचा आशिष शेलार यांनी इन्कार केला. आज राऊत यांनीही त्याचा इन्कार केला. अफवा पसरवल्या जातात. ज्यांना माझ्यापासून वेदना होतात, यातना होतात असे लोक अफवा पसरवत असतात. महाराष्ट्रात दोन वेगळ्या पक्षाचे नेते भेटले तर आश्चर्य वाटण्याचं कारण काय?, असा सवाल करतानाच मी काल दिवसभर कामात होतो. कुणालाही भेटलो नाही. तरीही अफवा पसरवण्यात आल्या. अशा अफवा पसरवल्याने राजकारण हलत नाही, अस्थिरही होत नाही. महाराष्ट्र सरकारला अडचणीही होत नाहीत, असं राऊत म्हणाले.
उद्यापासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. विरोधकांना महाराष्ट्राची चिंता असेल तर त्यांनी अधिवेशन चालू द्यावं. केवळ दोन दिवसांचं अधिवेशन आहे. त्यात गोंधळ घालू नये. चर्चा करावी. गोंधळ म्हणजे रणनीती नसते. गोंधळ करून अधिवेशन बंद पाडणं योग्य नाही. गोंधळात अधिवेशन वाहून जाऊ नये, असं सांगतानाच राज्यापुढे अनेक प्रश्न आहे. एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्यावर चर्चा होऊ शकते. कोरोनावर चर्चा होऊ शकते, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होऊ शकते, असंही ते म्हणाले.




