Top Newsराजकारण

समीर वानखेडेंकडून हस्तकांकरवी ड्रग्स खरेदी, फोन टॅपिंग, बनावट खटले !

मुंबई : एनसीबीच्या मुंबई कार्यालयात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने समीर वानखेडेंविरोधात पाठवलेले निनावी पत्र प्रसिद्ध करत नवाब मलिक यांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे. या पत्रामधून एनसीबीच्या या अधिकाऱ्याने समीर वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहे. समीर वानखेडे यांनी तपास केलेल्या २६ खटल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच वानखेडे यांच्या टीममधील काही अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

नवाब मलिक यांना पाठवलेल्या या पत्रात सदर अधिकारी म्हणतो की, समीर वानखेडे हे प्रसिद्धीलोलूप अधिकारी आहेत. त्यांना माध्यमांमध्ये चर्चेत राहणे आवडते. त्यासाठी समीर वानखेडे यांनी अनेक निर्दोष लोकांना बनावट एनडीपीएस केसमध्ये अडकवले आहे. तसेच बनावट केस उभ्या करण्यासाठी समीर वानखेडे यांनी एक टीम उभी केली आहे. त्यामध्ये सुपरिटेंडेंट विश्वविजय सिंह, आयओएस आशिष रंजन, किरण बाबू, विश्वनाथ तिवारी, जेआयओ सुधाकर शिंदे, ओटीसी कदम, शिपाई रेड्डी, पी.डी. मोरे, विष्णू मीणा, यूडीसी सूरज, ड्रायव्हर विजय अनिल माने आणि समीर वानखेडेंचा खासगी सचिव शरद कुमार यांचा समावेश आहे.

ओटीसी कदम, शिपाई रेड्डी, पी.डी. मोरे आणि विष्णू मीणा, ड्रायव्हर अनिल माने हे कुणाच्याही घरी तपास सुरू असताना ड्रग्स ठेवायचे आणि संबंधितांवर खोटी केस दाखल करत. जर कुणाच्याही घरी ड्रग्स सापडला तर त्याचे प्रमाण अधिक दाखवून जामीन मिळू नये म्हणून त्याला व्यावसायिक ड्रग्सचे प्रकरण बनवायचे. तर आयओएस आशिष रंजन, किरण बाबू, विश्वनाथ तिवारी जेआयओ सुधाकर शिंदे नकली पंचनामे रंगवायचे. हे पंचनामे एनसीबीच्या कार्यालयातच तयार केले जात, असा दावाही या पत्रातून करण्यात आले.

दरम्यान, समीर वानखेडे त्यांच्या काही हस्तकांकडून ड्रग्स खरेदी करतात आणि बनावट केस उभ्या करतात, असाही आरोप पत्रातून करण्यात आला आहे. समीर वानखेडेंच्या हस्तकांची नावे ही दशरथ, जमील, अफजल, मोहम्मद, शेख, नासिर, आदिल उस्मानी अशी आहेत, असा दावाही या पत्रातून करण्यात आला आहे. तसेच समीर वानखेडेंनी तपास केलेल्या २६ खटल्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

नवाब मलिक यांनी यासंदर्भात एक ट्विट करत हे पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यात ते म्हणतात की, एनसीबीमधील एका अधिकाऱ्याने पाठवलेल्या निनावी पत्रामधील मजकूर येथे आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे पत्र डीजी नार्कोटिक्स यांना पाठवणार आहे. आता समीर वानखेडेच्या चौकशीमध्ये हे पत्र समाविष्ट करण्याची विनंती केली आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
समीर वानखेडे यांना केपीएस मल्होत्राची साथ

एनसीबीमध्ये काही बोगस अधिकाऱ्यांची टोळी तयार झाली आहे. ही टोळी लोकांना ड्रग्सच्या केसमध्ये फसवते. अशा २६ केसचा या पत्रामध्ये उल्लेख आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी हे पत्र प्रसिद्ध केल्यानंतर दिलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. तसेच समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याच्या दाव्याचा नवाब मलिक यांनी पुनरुच्चार केला आहे. एका गरजू मागासवर्गीत उमेदवाराचा नोकरीचा हक्क समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र दाखवून हिरावल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. तसेच यासंदर्भात जातवैधता समितीकडे तक्रार करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

दरम्यान, एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने नवाब मलिक यांना पाठवलेल्या निनावी पत्रामध्ये समीर वानखेडेंनी हाताळलेल्या ड्रग्स प्रकरणातील २६ केसचा उल्लेख आहे. या पत्रात एनसीबीचा अधिकारी म्हणतो की, एनसीबीचे आधीचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी समीर वानखेडे यांना अमित शाहांना सांगून नियमबाह्य पद्धतीने झोनल डायरेक्टर पदावर नियुक्त केले. तसेच समीर वानखेडे आणि केपीएस मल्होत्रा यांना बॉलिवूडला सर्व मार्ग अवलंबून ड्र्ग्सच्या प्रकरणात अडकवण्याचे आदेश दिले.

बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी

वानखेडेंच्या वडिलांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. मात्र समीर वानखेडेंनी बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली. ही फसवणूक आहे. समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपांवर मी ठाम आहे. त्यांनी माझ्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा. मी कोर्टाच्या कार्यवाहीला सामोरं जाण्यास तयार आहे, असं नवाब मलिक आज पत्रकार परिषदेत म्हणाले. वानखेडेंनी अनेक बड्या लोकांचे फोन टॅप केल्याचा आरोपही त्यांनी केला.

मागच्या दोन दिवसांपासून एनसीबीच्या समीर वानखेडे यांच्या बाबत अनेक बाबी समोर आल्या आहेत. ६ तारखेपासून आम्ही अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यामध्ये आता अधिक स्पष्टता आली आहे. आमची लढाई एनसीबीसोबत नाही. एनसीबीनं अनेकदा चांगलं काम केलं आहे. परंतु एक व्यक्ती बोगसगिरी करून नोकरी घेतो आणि ज्यावेळी या बाबी समोर आणल्या, त्यावेळी मात्र वानखेडे म्हणतात माझ्या कुटुंबावर नवाब मलिक आरोप करत आहेत. मी हिंदू मुस्लिम असा मुद्दा समोर आणत नव्हतो. भाजपने अनेकवेळा म्हटलं, नवाब मलिक मुस्लिम असल्यामुळे अशाप्रकारे आरोप करत आहेत. मात्र मी कधीही असं केलं नाही. समीर वानखेडेंनी खोटा जन्म दाखला सादर करून नोकरी घेतली. ही गोष्ट चुकीची आहे, असं मलिक म्हणाले.

वानखेडे यांच्याविरुद्ध सुरू केलेली लढाई आम्ही अशीच पुढे घेऊन जाणार आहोत, असं मलिक यांनी सांगितला. मी जो दाखला ट्विट केला आहे तो खरा आहे. जर तुम्ही लक्षपूर्वक दाखला पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की त्यावर नाव वेगळं एका बाजूला लिहिण्यात आलं आहे. समीर वानखेडे जन्मापासून दलित आहेत असं सर्टिफिकेट दिलं. त्याआधारे आत्तापर्यंत नोकरी केली. समीर यांच्या वडिलांनी एका मुस्लिम महिलेसोबत लग्न केलं आणि त्यानंतर ते मुस्लिम म्ह्णून राहत होते. परंतु नोकरीच्या वेळी त्यांनी आपला दाखला बदलला. त्यांनी वडिलांच्या जातीचा वापर केला. जर मी सादर केलेलं सर्टिफिकेट खोटं आहे तर मग त्यांच्या वडिलांनी किंवा स्वतः वानखेडे यांनी आपलं जन्म प्रमाणपत्र समोर आणावं, असं आव्हान मलिक यांनी दिलं.

वानखेडेंनी जातीचा दाखला जाहीर करावा; मलिकांचं आव्हान

मी शेअर केलेलं जन्म प्रमाणपत्र खोटं असेल तर खरं कोणतं आहे हे वानखेडे परिवाराने किंवा समीर वानखेडे यांनी स्वत: समोर येऊन दाखवावं. त्यांचे वडील जातीचं प्रमाणपत्र दाखवत आहेत. समीर वानखेडेंनी जात प्रमाणपत्र जाहीर करावं, असं आव्हान नवाब मलिक यांनी दिलं आहे. तसंच, जर तुम्ही ते जाहीर केलं नाही किंवा सरकारी कागदपत्र नष्ट करण्याचा कोणी प्रयत्न केला तरी कुठे ना कुठे ती माहिती असते. सर्व कागदपत्र आम्ही बाहेर काढत आहोत. लवकरच हे प्रकरण जातपडताळणी समिती समोर जाईल, असं देखील नवाब मलिक यांनी सांगितलं.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे केले. गोष्टी जेव्हा समोर आणत आहोत, तर काहीजण नवाब मलिक एका अधिकाऱ्याचे खासगी जीवनातील माहिती सार्वजनिक करत असल्याची टीका करत आहेत. पती पत्नी, वडील, बहिण या सर्वांना यात खेचलं जात असल्याचं देखील म्हणत आहेत. परंतु आम्ही कोणाही बद्दल अभद्र असं काहीही केलेलं नाही. सोमवारी जन्माचा दाखला ट्विटरवर शेअर केला त्यामुळे अनेक गोष्टी समोर आल्या. मी काही हिंदू-मुस्लीम मुद्दा पुढे आणत नाही आहे. भाजपने या प्रकरणावरुन हिंदू-मुस्लीम असा मुद्दा पेटवण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या सार्वजनिक जीवनात धर्माच्या नावावर राजकारण केलेलं नाही आणि लोकांना हे माहिती आहे. जो व्यक्ती बनावट जन्माचा दाखला तयार करुन सरकारी अनुसूचित जातीच्या श्रेणीमध्ये नोकरी मिळवतो यावर आम्ही प्रश्न उपस्थित केला आहे. अनुसूचित जातीच्या एका व्यक्तीची अधिकारी होण्याची संधी यानी हिरावून घेतली आहे. या लढाईला आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत, असं नवाब मलिक यांनी सांगितलं

मला वैयक्तिक बदनामी करायची नाही. परंतु समीर वानखेडेंच्या वडिलांनी धर्मातर करून विवाह केला होता. समीर यांनी बनावट जात प्रमाणपत्र बनवून ‘आयआरएस’ नोकरी घेतली. याबाबत आपण ठाम आहोत. त्यांनी आपल्या विरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा, न्यायालयात सर्व सत्य बाहेर येईल, असं मलिक म्हणाले.

अनेक बड्या लोकांचे फोन टॅप

वानखेडेंकडून अनेक राजकारणी, बॉलिवूड कलाकार, बिल्डरांचे फोन टॅप केले जातात. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे दोन खासगी व्यक्तींद्वारे काही व्यक्तींचे फोन टॅपिंग करत आहेत. यातील एक व्यक्ती मुंबईतील आणि दुसरी व्यक्ती ठाण्यातील आहे, असा दावादेखील मलिक यांनी केला.

माझी मुलगी गुन्हेगार आहे काय?; नवाब मलिक यांचा संताप

समीर वानखेडे यांनी माझ्या मुलीचा सीडीआर पोलिसांकडे मागितला. सीडीआर हा गुन्हेगारांचा मागवला जातो. सीडीआर मागवायला माझी मुलगी गुन्हेगार आहे काय?, असा संतप्त सवाल प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना हा सवाल केला आहे. आम्ही कुणाच्याही खाजगी आयुष्याच्या अधिकाराचा भंग केला नाही. एखादा व्यक्ती धर्मांतर करून दुहेरी लाभ घेत असेल तर त्याचा उल्लेख केला पाहिजे. सत्य समोर आणण्यासाठी काही गोष्टी बाहेर येत आहेत. कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर आम्ही घाला घालत नाही. माझ्या जावयाला बंद केलं गेलं. कोर्टात प्रकरण आहे. माझी मुलगी अनेक कागदपत्रं काढण्याचा प्रयत्न करत आहे. समीर वानखेडेंनी मुंबई पोलिसांना पत्रं लिहून माझ्या मुलीचा सीडीआर मागितला. माझी मुलगी निलोफर मलिक काय गुन्हेगार आहे का? कोणत्या आधारावर माझ्या मुलीच्या खाजगी आयुष्याची माहिती मागितली आहे.? असा सवाल करतानाच वानखेडे आपल्या मर्यादेचा भंग करत आहेत, असं मलिक म्हणाले.

पोलिसांनी सीडीआर देण्यास नकार दिला. तिच्या खासगी आयुष्याची माहिती देऊ शकत नाही असं पोलिसांनी सांगितलं. माझ्या माहितीनुसार या शहरात दोन प्रायाव्हेट व्यक्तींच्या माध्यमातून फोन इंटरसेप्ट करत आहेत. त्या दोन व्यक्तींचे नावे आणि पत्ते माझ्याकडे आहेत. ही लढाई अजून दीर्घ चालेल, असं ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button