Top Newsअर्थ-उद्योगराजकारण

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ११ मार्च रोजी सादर होणार

अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईतच होणार

मुंबई: महाराष्ट्र विधानमंडळाचे सन २०२२ चे पहिले (अर्थसंकल्पीय अधिवेशन) मुंबईत गुरुवार दि. ३ मार्च २०२२ रोजी सुरु होणार असून दि. २५ मार्च २०२२ पर्यंत अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. हा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

सन २०२२-२३ या वर्षाचा अर्थ संकल्प दि. ११ मार्च रोजी सादर करण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला कोविडच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन सर्वांनी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधकारक आहे तसेच कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले

विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (ऑनलाईन उपस्थित) उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, विधानपरिषद आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.

अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात नाही

यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईतच होणार आहे. नागपूरमध्ये हे अधिवेशन होणार नाही. तशी माहिती आज सरकारकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी आहेत. त्यांना प्रवास करण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे. त्यामुळे ते नागपूरला जाऊ शकत नाही. म्हणून हे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईतच घेण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे भाजप काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसने मागच्या बैठकीत हिवाळी अधिवेशन घेण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे पुढील अधिवेशन नागपुरात घेण्याचं आश्वासन काँग्रेस नेत्यांना देण्यात आलं होतं. त्यानुसार अधिवेशनाची तारीख आणि स्थान जाहीर करण्यात आलं होतं. मात्र, आता पुन्हा हे अधिवेशन मुंबईलाच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्याचं प्रत्येक हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत असतं. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनापूर्वी आजारी पडले. त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रियाही करण्यात आली. डॉक्टरांनी त्यांना प्रवास करण्यास मनाई केलं होतं. त्यामुळे नागपूरला अधिवेशन घेण्याऐवजी मुंबईतच अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, पुढचं अधिवेशन नागपुरात घेणार असल्याचं सरकारकडून विरोधकांना आश्वासन दिलं होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नसल्याने आता हे अधिवशेन मुंबईतच घेण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button