टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर 10 विकेट्सने मात, मालिकेत 2-1 आघाडी
अहमदाबाद : टीम इंडियाने तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशीच इंग्लंड वर 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. इंग्लंडने भारताला विजयासाठी अवघ्या 49 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान टीम इंडियाच्या सलामी जोडीनेच पूर्ण केलं. रोहित शर्माने नाबाद 25 तर शुबमन गिलने नाबाद 15 धावा केल्या.
सामना दुसऱ्या दिवशी निकाली
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर फिरकी गोलंदाजांची चलती पाहायला मिळाली. टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांनी दोन्ही डावात मिळून मिळून 20 पैकी 19 विकेट्स या फिरकी गोलंदाजांनी घेतल्या. तर एकमेव विकेट ही वेगवान गोलंदाजाच्या खात्यात गेली.
लोकल बॉय अक्षर पटेलने पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 6 अशा एकूण 11 विकेट्स घेतल्या. तर आर अश्विनने पहिल्या आणि दुसऱ्या डावात मिळून एकूण 7 विकेट्स घेतल्या. वॉशिंग्टन सुंदर आणि इशांत शर्माला 1 विकेट मिळाली.
अक्षर पटेलचा जलवा, दुसऱ्या कसोटीत एकूण 11 विकेट्स
लोकल बॉय अक्षर पटेलने आपल्या फिरकीवर पाहुण्या इंग्लंडला नाचवलं आहे. अक्षरने या सामन्यात एकूण 11 विकेट्स घेतल्या आहेत. अक्षरने पहिल्या डावात 6 तर दुसऱ्या डावात 5 अशा एकूण 11 विकेट्स घेतल्या आहेत.
अश्विनची रेकॉर्डब्रेक कामगिरी; कसोटीत 400 बळींचा टप्पा पार
या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विनने इंग्लंडच्या पहिल्या डावात 3 गडी बाद केले, दुसऱ्या डावात 4 गडी बाद करत सामन्यात एकून 7 बळी मिळवले. या कामगिरीसह अश्विनने कसोटी क्रिकेटमधील 400 बळींचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अश्विनने इंग्लंडचा जोफ्रा आर्चरला बाद करून कसोटीत 400 बळींचा टप्पा गाठला. त्याच्याआधी भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे (619), कपिल देव (434) आणि हरभजन सिंग (417) यांनी ही कामगिरी केली आहे. यासह अश्विनने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एकूण 600 बळीही पूर्ण केले आहेत.
मुरलीधरननंतर सर्वात जलद 400 विकेट्स
अश्विनने 400 बळी घेण्याच्या बाबतीत अनेक दिग्गजांना मागे टाकलं आहे. 400 विकेट्स घेणारा तो जगातील दुसरा वेगवान गोलंदाज आहे. अश्विनने आपल्या 77 व्या कसोटी सामन्यात 400 बळींचा टप्पा पार केला आहे. तर श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने 72 कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. जलद 400 बळी मिळवण्याच्या बाबतीत अश्विने न्यूझीलंडचा दिग्गज गोलंदाज रिचर्ड हॅडलीला मागे टाकलं आहे. हॅडलीने 80 कसोटी सामन्यांमध्ये 400 बळी पूर्ण केले होते. हॅडलीबरोबर दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन आहे. स्टेननेही 80 व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली होती. त्यानंतर श्रीलंकेच्या रंगना हेराथचा नंबर लागतो, त्याने 84 कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती.
600 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा पाचवा गोलंदाज
अश्विनने आर्चरच्या आधी बेन स्टोक्सला बाद करून 600 आंतरराष्ट्रीय विकेट पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी करणारा तो भारताचा पाचवा गोलंदाज ठरला आहे. कसोटीत 400 विकेट घेण्याव्यतिरिक्त अश्विनने एकदिवसीय सामन्यांमध्ये 150 आणि टी -20 क्रिकेटमध्ये मध्ये 52 बळी घेतले आहेत. या यादीत अश्विनच्या पुढे अनिल कुंबळे, कपिल देव, हरभजन सिंह, झहीर खान यांची नावे आहेत. भारताचा माजी कर्णधार कुंबळे याच्या नावार 956 आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत. हरभजनने 711 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. हरभजननंतर विश्वचषक विजेता कप्तान कपिल देवचा नंबर लागतो. कपिल देवच्या नावावर 687 विकेट्स आहेत. तर या यादीत झहीर खान चौथ्या स्थानी आहे. झहीर खानने 610 आंतरराष्ट्रीय बळी मिळवले आहेत.