थरारक सामन्यात मुंबई इंडियन्सची कोलकात्यावर १० धावांनी मात

चेन्नई : चेन्नईतल्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021 – आयपीएल ) मधील पाचव्या सामन्यात मुंबई इंडियन्सन कोलकात्यावर १० धावांनी मात केली आहे. मुंबई इंडियन्सने यावेळी केकेआरच्या तोंडातील विजयाचा घास हिरावल्याचे पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सचा संघ १५२ धावांवर ऑलआऊट झाला होता. त्यामुळे १५३ धावांचा पाठलाग करताना केकेआरने बिनबाद ७२ अशी दमदार सुरुवात केली होती. पण त्यानंतर केकेआरचे फलंदाज एकामागून एक बाद होत गेले आणि त्यांना हातातील सामना गमवावा लागला. मुंबई इंडियन्सने अखेरच्या षटकामध्ये केकेआरवर १० धावांनी विजय साकारला. या विजयासह मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे.
मुंबईच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत हा सामना कोलकात्याच्या हातून हिरावला आहे. मुंबईकडून या सामन्यात राहुल चहरने ४ षटकात २७ धावा देत ४ बळी घेतले. तर ट्रेंट बोल्टने ४ षटकात २७ धावा देत २ बळी घेत मुंबईच्या विजयात निर्णायक भूमिका निभावली. कोलकात्याकडून या सामन्यात सलामीवीर नितीश राणाने सर्वाधिक ५७ धावा केल्या. शुभमन गिलने ३३ धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त कोलकात्याच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.
मुंबईचा यंदाच्या मोसमातील पहिला विजय ठरला. तसेच केकेआरविरुद्ध हा मुंबईचा २८ सामन्यांत २२ वा विजय होता. या सामन्यात मुंबईने केकेआरपुढे १५३ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना शुभमन गिल (३३) आणि नितीश राणा (५७) यांनी केकेआरच्या डावाची दमदार सुरुवात केली. या दोघांनी ७२ धावांची सलामी दिल्यावर दोघांनाही चहरने माघारी पाठवले. यानंतर केकेआरने झटपट विकेट गमावल्या. त्यांच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.
तत्पूर्वी केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गनने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. या सामन्यात क्विंटन डी कॉकचे मुंबईच्या संघात पुनरागमन झाले. मात्र, त्याला फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. वरूण चक्रवर्तीने त्याला २ धावांवर बाद केले. यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी अप्रतिम फलंदाजी करत ७६ धावांची भागीदारी रचली. अखेर सूर्यकुमारला ५६ धावांवर शाकिब अल हसनने बाद करत ही जोडी फोडली. तर रोहितचे अर्धशतक सात धावांनी हुकले. त्याला ४३ धावांवर पॅट कमिन्सने बाद केले. यानंतर आंद्रे रसेलच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईचा डाव गडगडला. केवळ हार्दिक आणि कृणाल पांड्याला १५-१५ धावा करता आल्या. त्यामुळे मुंबईचा डाव २० षटकांत १५२ धावांवर आटोपला. रोहित बाद झाल्यावर मुंबईचा डाव कोसळला आणि त्यांच्यावर ऑलआऊट होण्याची वेळ आली. रसेलने १५ धावांत ५ विकेट घेतल्या.