स्पोर्ट्स

इटलीला ५३ वर्षांनंतर यूरो फुटबॉलचे विजेतेपद; इंग्लंडचा घरच्या मैदानावर पराभव !

लंडन : यूरो स्पर्धेच्या इतिहासात सर्वात वेगवान गोलचा विक्रम इंग्लंड विरुद्ध इटली यांच्यातल्या सामन्यात नोंदवला गेला. इंग्लंडनं १.५७ मिनिटालाच गोल खाते उघडले, परंतु आतापर्यंत बलाढ्य प्रतिस्पर्धींना कडवी मात देऊन अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या इटलीनं दुसऱ्या हाफमध्ये बरोबरीचा गोल करून इंग्लंड समर्थकांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडवला. दुसऱ्या मिनिटाला मिळालेल्या आघाडीनंतर निर्धास्त झालेल्या थ्री लायन्सला अतिबचावात्मकता महागात पडली. इटलीनं संयमी खेळ करताना चेंडूवर अधिककाळ ताबा ठेवत ९० मिनिटांच्या आणि त्यानंतर अतिरिक्त ३० मिनिटांच्या खेळात सामना १-१ असा बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. उपांत्य फेरीत पेनल्टी शूटआऊटमध्ये इटलीनं माजी विजेत्या स्पेनचे आव्हान संपुष्टात आणले होते. त्यामुळे इंग्लंडच्या चाहत्यांना पेनल्टी शूटआऊटचा थरार नको होता. याही सामन्यात इटलीनं बाजी मारली आणि विम्बल्डी स्टेडियमवर स्मशानशांतता पसरली. पेनल्टी शूटआऊटमध्ये इटलीनं १-१ (३-२) असा विजय मिळवला.

इंग्लंडने ५५ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या दिशेने दमदार सुरूवात केली. दुसऱ्याच मिनिटाला इटलीच्या बचावफळीत झालेल्या चुकीचा फायदा उचलला. के ट्रीपीयरने पेनल्टी बॉक्स बाहेरून दिलेल्या पासवर ल्यूक शॉ याने सुरेख गोल केला. दुसऱ्याच (१.५७ मि.) मिनिटाला इंग्लंडने १-० अशी आघाडी घेतली. यूरो फायनलमधील हा सर्वात जलद गोल ठरला. इथेच इटलीचे खेळाडू खचले. इंग्लंडने त्यानंतर आणखी आक्रमक खेळ करून इटलीवर दडपण टाकण्याचा प्रयत्न केले. पहिल्या हाफमध्ये ४ मिनिटांचा भरपाई वेळ जोडण्यात आला आणि त्यात बरोबरी मिळवण्याच्या जवळ इटली पोहोचलाच होता, परंतु जॉन स्टोन याने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. पहिल्या ४५+४ मिनिटांच्या खेळात इटलीकडे सर्वाधिक वेळ चेंडूचा ताबा होता, परंतु त्याचा फायदा करून घेण्यात ते अपयशी ठरले.

दुसऱ्या हाफच्या चौथ्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर पेनल्टी वर्तुळावरुन इटलीला बरोबरीचा गोल करण्यात पुन्हा अपयश आले. लोरेजो इन्सिग्ने याने ही संधी गमावली. इंग्लंडचा संघ बचावात्मक मोडमध्ये होता. त्यांच्या बचावपटूूनी सुरेख कामगिरी बजावली. सामना पुढे सरकत असताना इटलीच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावरील निराशा आणखी वाढत होती. पण ६७व्या मिनिटाला हे नैराश्य नाहीशे झाले. लिओनार्डो बोनसीने इटालीला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. या गोलनंतर लंडनमधील विम्बली स्टेडियमवर सन्नाटा पसरला. आतापर्यंत विजयाच्या नशेत नाचणारे इंग्लंड समर्थक गपगार झाले. यूरो स्पर्धेच्या फायनलमध्ये गोल करणारा बोनसी हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. ३४ वर्षे व ७१ दिवसांच्या बोनसीनं गोल करून १९७६ साली बेर्न्ड होलझेमबेन यांचा (३० वर्षे व १०३ दिवस) विक्रम मोडला.

या गोलनं इटलीच्या ताफ्यात जणू प्राण ओतले अन् त्यांचा आक्रमक खेळ सुरू झाला. इंग्लंडलाही बचावात्मक खेळ करण्याची रणनीती सोडून आक्रमणाची कास धरावी लागली. पण इटलीनं छोटे छोटे पास करत खेळ केला अन् ९० + ६ मिनिटांच्या भरपाई वेळेतही बरोबरीची कोंडी फुटली नाही. अतिरिक्त ३० मिनिटांच्या खेळातील सहाव्या मिनिटाला रहिम स्टेर्लिंगचा गोल करण्याचा प्रयत्न इटलीचा कर्णधार जिऑर्जीओ चिएलीनीनं अपयशी ठरवला. गोलजाळीनजीक आलेल्या स्टेर्लिंगनं मारलेला चेंडू चिएलीनीनं अडवला. इटलीही आघाडी घेण्याच्या अगदी नजीक आली होती, परंतु त्यांच्याही वाट्याला निराशा आली. इटलीच्या या कमबॅकनं इंग्लंडच्या चाहत्यांना मात्र तणावात ढकलले होते. अतिरिक्त ३० मिनिटांच्या खेळातही 1-1 अशी बरोबरी कायम राहिली.

पेनल्टी शूटआऊटचा थरार

इटली – डी बेराडीनं ( गोल), ए बेलोट्टी ( संधी गमावली), लिओनार्डो बोनसी ( गोल), एफ बेर्नाडेसी ( गोल),
इंग्लंड – हेरी केन, एच मार्गुरे (गोल), रशफोर्ड (संधी गमावली, चेंडू गोलजाळीला लागून माघारी), सांचो ( संधी गमावली), बी साका ( संधी गमावली)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button