दुबई : भारतीय क्रिकेट संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत स्कॉटलंडवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह यांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर टीम इंडियानं स्कॉटलंडला गुडघे टेकण्यास भाग पाडले. त्यानंतर रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी तुफान फटकेबाजी करताना भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. ही दोघं समोर आलेला प्रत्येक चेंडू सीमारेषेपार सहजतेनं टोलवंत होते. भारताला हा सामना ७.१ षटकांत जिंकायचा होता, परंतु भारतीय संघानं ६.३ षटकांत सामना जिंकला. नेट रन रेटमध्ये अफगाणिस्तान व न्यूझीलंडलाही मागे टाकले. त्यामुळे आता अफगाणिस्तान व न्यूझीलंडवर दडपण वाढले आहे.
तीन फिरकीपटूंसह मैदानावर उतरण्याचा विराट कोहलीचा निर्णय योग्य ठरला. रवींद्र जडेजानं आज ट्वेंटी-२० तील त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करताना स्कॉटलंडचे कंबरडे मोडले. त्याला अन्य गोलंदाजांची चांगली साथ मिळाली. मोहम्मद शमी पुन्हा स्टार ठरला आणि त्यानं सलग तीन विकेट्स घेतल्या, परंतु यापैकी एक रन आऊट असल्यानं ही टीमची हॅटट्रिक ठरली. जसप्रीत बुमराहनं दोन विकेट्स घेत ट्वेंटी-२०त भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.
भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह तिसऱ्याच षटकात स्कॉटलंडचा सलामीवीर कायले कोएत्झरचा त्रिफळा उडवला. जॉर्ज मुन्सी एका बाजूनं फटकेबाजी करत होता. त्यानं आर अश्विनला रिव्हर्स स्वीप मारत खेचलेले तीन चौकार अप्रतिम होते. विराटनं संघातील यशस्वी गोलंदाज मोहम्मद शमी याला पाचारण केलं आणि त्यानं पहिल्याच षटकात यश मिळवून दिलं.
शमीनं ६ व्या षटकात मुन्सीला (२४) बाद केलं. त्यानंतर आलेल्या रवींद्र जडेजानं एकाच षटकात दोन धक्के देत स्कॉटलंडची अवस्था बिकट केली. जडेजानं ७व्या षटकात रिची बेरींग्टन (०) व मॅथ्यू क्रॉस (२) यांची विकेट घेतली. मिचेल लिस्क टीम इंडियाची डोकेदुखी ठरत होता. त्यानं १२ चेंडूंत २ चौकार व १ षटकाराह २१ धावा केल्या. जडेजानं त्याला पायचीत केले. स्कॉटलंडचा निम्मा संघ ५८ धावांवर माघारी परतला. जडेजानं चार षटकांत १५ धावांत ३ विकेट्स घेतल्या. ट्वेंटी-२०तील ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. आर अश्विननं ख्रिस ग्रिव्हला ( १) बाद करून सहावा धक्का दिला. अश्विनच्या खात्यात आणखी एक विकेट जमा झाली असती, परंतु रिषभ पंतनं स्टम्पिंगची संधी गमावली. अश्विननं २९ धावांत १ विकेट घेतली. मोहम्मद शमीनं १७व्या षटकात सलग तीन विकेट्स घेतल्या. बुमराहनं एक विकेट घेत स्कॉटलंडचा डाव ८५ धावांवर गुंडाळला.
जसप्रीत बुमराहनं ३.४ षटकांत १० धावा देत २ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजा ( ३-१५) नं ट्वेंटी-२०तील वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली, तर मोहम्मद शमीनं ३ षटकांत १ निर्धाव षटक फेकताना १५ धावांत तीन विकेट्स घेतल्या. बुमराहनं ५४ सामन्यांत ६४ विकेट्स घेताना ट्वेंटी-२०त सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाचा मान पटकावला. युझवेंद्र चहल ६३ विकेट्ससह आघाडीवर होता. आर अश्विननं २९ धावांत १ विकेट घेतली. स्कॉटलंडकडून जॉर्ज मुन्सी (२४), मिचेल लिस्क (२१) हे चांगले खेळले. स्कॉटलंडचा संपूर्ण संघ १७.४ षटकांत ८५ धावांवर माघारी परतला.
पहिल्या दोन सामन्यांत लाजीरवाण्या पराभवानंतर टीम इंडियानं फिनिक्स भरारी घेतली. आज तर त्यांनी स्कॉटलंडचा पालापाचोळा केला. नेट रन रेट सुधारून उपांत्य फेरीच्या शर्यतीत मोठी आघाडी घेण्यासाठी ७.१ षटकांत सामना जिंकयचा होता आणि त्यांनी ६.३ षटकांत तो जिंकला. लोकेश राहुलनं रन रेटचे गणित डोळ्यासमोर ठेऊन सुसाट खेळ केला. रोहित शर्मा एका बाजूनं शांत उभा राहून राहुलची फटकेबाजी पाहत होता. लोकेशनं तिसऱ्या षटकात १६ धावा काढल्या. चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रोहितची गाडी सुसाट पळाली आणि त्यानं चेंडू प्रेक्षकांमध्ये पोहोचवला. रोहित-राहुल जोडीनं चार षटकांत धावफलकावर अर्धशतकी धावा फडकवल्या. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील टीम इंडियाची ही सर्वात जलद अर्धशतकी भागीदारी ठरली. रोहित १६ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३० धावांवर बाद झाला. राहुलनं १८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. पण, पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला.
राहुलनं १९ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकार खेचून ५० धावा केल्या. ट्वेंटी-२०तील हे भारताकडून दुसरे जलद अर्धशतक ठरले. युवराज सिंगनं २००७मध्ये १२ चेंडूंत इंग्लंडविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. २००९मध्ये गौतम गंभीरनं श्रीलंकेविरुद्ध १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं होतं. भारतानं हा सामना ८ विकेट्स व ८१ चेंडू राखून जिंकला. भारतानं ६.३ षटकांत २ बाद ८९ धावा केल्या.
भारताचा नेट रन रेट आता न्यूझीलंड व अफगाणिस्तान यांच्यापेक्षा सरस आहे. भारतानं आता ४ गुण व १.६१९ नेट रन रेटसह तिसऱ्या स्थानी झेप घेत, अफगाणिस्तानला ( ४ गुण व १.४८१) चौथ्या क्रमांकावर ढकलले. ६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडचाही नेट रन रेट (१.२७७) हा भारतापेक्षा कमीच आहे. भारतानं या सामन्यात विजय मिळवला असला तरी त्यांचे भवितव्य हे अफगाणिस्तानच्या हातात आहे. न्यूझीलंडनं ७ नोव्हेंबरला जर अफगाणिस्तानला पराभूत केलं, तर पाकिस्तान व किवी उपांत्य फेरीत जातील. पण, अफगाणिस्ताननं धक्कादायक निकाल नोंदवल्यास आणि भारतानं नामिबियाला पराभूत केल्यास तिन्ही संघांचे सहा गुण होतील आणि नेट रन रेटवर ग्रुप २ मधील दुसरा उपांत्य फेरीत जाणारा संघ ठरेल.