नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने आता एक धोक्याचा इशारा दिला आहे. डेल्टा आणि ओमायक्रॉन हे डबल डेंजरस असल्याचं म्हटलं आहे. डेल्टानंतर आलेला ओमायक्रॉन यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढत आहे.
जगभरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरातील रुग्णांच्या संख्येने तब्बल २८ कोटींचा टप्पा पार केला असून एकूण कोरोना रुग्णांची संख्या २८,४९,१७,११० वर पोहोचली आहे. तर ५४,३८,८९७ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान ओमायक्रॉनने सर्वांचेच टेन्शन वाढवले आहे.
ओमायक्रॉन आणि डेल्टा मिळून कोरोनाची त्सुनामी आणत आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येत चिंतेत भर टाकलेली असतानाच आता जागतिक आरोग्य संघटने (डब्लूएचओ) ने हा गंभीर इशारा दिला आहे. ओमायक्रॉन आणि डेल्टाची त्सुनामी प्रचंड काम करणाऱ्या आरोग्य यंत्रणांवर मोठा तणाव आणेल असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. या तणावामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडेल असा इशाराच त्यांनी दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरियंट धोकादायक असून त्यांच्यामुळे रुग्णसंख्या नवे रेकॉर्ड नोंदवत असून रुग्णालयात दाखल रुग्ण आणि मृत्यूंचं प्रमाणही वाढत आहे.
लसीकरणाच्या आधारे कोरोनावर पूर्पणणे नियंत्रण आणता येईल अशी अपेक्षा असतानाच कोरोनाचे नवे व्हेरियंट नवं आव्हान निर्माण करत आहेत. यामुळे अनेक देशांनी पूर्वतयारी करत निर्बंध लावण्यासही सुरुवात केली आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याचा इशारा दिला आहे. “मला ओमायक्रॉनसंबंधी फार चिंता आहे, हा फार संसर्गजन्य आहे. डेल्टा असतानाच ओमायक्रॉन आल्याने केसेसची त्सुनामी येत आहे” असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस यांनी सांगितलं आहे. तसेच गेल्या आठवड्यात जागतिक रुग्णसंख्या ११ टक्क्यांनी वाढली असून अमेरिका आणि फ्रान्समध्ये बुधवारी सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाली आहे.
टेड्रोस यांनी आधीच थकलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर यामुळे खूप तणाव येणार असून आरोग्य यंत्रणा कोसळण्याची भीती आहे, असंही म्हटलं आहे. यासोबतच फक्त नव्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येणार नसून अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे हेदेखील एक कारण आहे. कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. अनेक देशांमध्ये लहान मुलांना देखील ओमायक्रॉनची लागण होत असून रुग्णालयातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.