Top Newsराजकारण

‘चंपा’ म्हणत शिवसेनेचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारावीच्या परीक्षेबाबत राष्ट्रीय धोरण असावे, असे नमूद करताना यासाठी हवे असल्यास मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलेन तसेच गरज असल्यास पत्र व्यवहारही करेन, अशी भूमिका जाहीर केली आहे. त्यावर टीका करताना उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरे यांचे लग्न जमावे म्हणूनही पंतप्रधानांना पत्र लिहितील, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावर शिवसेनेने जोरदार शब्दांत पलटवार केला आहे.

चंद्रकांत पाटील यांचा ‘चंपा’ असा उल्लेख करत शिवसेना प्रवक्ते किशोर कान्हेरे यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील यांचा तोल ढळला असून सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी त्यांची अवस्था झाल्याचेच हे लक्षण आहे व त्यातूनच ते बेताल आरोप करत आहेत, अशी खरमरीत टीका किशोर कान्हेरे यांनी केली आहे.

भाजपचे सर्वच नेते सत्तेबाबत स्वप्नभंग झाल्याने अस्वस्थ आहेत आणि त्यातूनच मीडियासमोर बोलल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. आपण राज्याच्या लोकप्रिय आणि जनमान्य मुख्यमत्र्यांवर पातळी सोडून टीका करतो आहोत याचेही भान त्यांना राहिलेले नाही, असे नमूद करत वैदर्भीय शैलीतही कान्हेरे यांनी पाटील यांच्यावर तोफ डागली आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

‘प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारवर ढकलायची सवय ठाकरे सरकारला लागली आहे. उद्या आदित्य ठाकरे यांच्या लग्नासाठी मुलगी बघायची झाली तर त्याबाबतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवतील. तुमच्या पाहण्यात कुणी असेल तर सांगा असं ते म्हणतील,’ असा टोला चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलताना हाणला होता. त्यावर लगेचच शिवसेनेने पलटवार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button