
मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. वर्षा बंगल्यावर झालेल्या भेटीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, यात राष्ट्रीय आणि राजकीय मुद्दे होते. दरम्यान, या भेटीनंतर चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचीही त्यांच्या निवास्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व विरोधी पक्ष एकत्र येत असल्याची माहिती दिली.

पत्रकारांशी बोलताना के. चंद्रशेखर राव म्हणाले की, तेलंगाणाला वेगळे राज्य बनवण्यासाठी जे आंदोलन झाले, त्यावेळी शरद पवारांनी पाठिंबा दिला होता. सर्वात आधी त्यासाठी मी त्यांचे खूप आभार मानतो. आपला देश सध्या अतिशय बेरोजगारीकडे जात आहे. बेरोजगारी आणि गरिबी वाढत आहे आणि विकास कमी होत आहे.
देशात खूप बदल करण्याची गरज आहे. या देशात बदल घडवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याची गरज आहे. याच अनुषंगाने आम्ही देशातील सर्व विरोधी पक्षांशी चर्चा करत आहोत. देशातील जनता विरोधकांकडे खूप आशेने बघत आहे. आम्ही इतर पक्षांशी चर्चा करुन आणि एक चांगला अजेंडा घेऊन पुन्हा तुमच्यासमोर येऊ. शरद पवारांसोबत याच मुद्द्यांवर चर्चा झाली, हेच विचार मी त्यांच्यासमोर ठेवले, अशी माहिती केसीआर यांनी दिली.
अनेक मुद्द्यांवर चर्चा – शरद पवार

यावेळी शरद पवार म्हणाले की, आजची बैठक वेगळ्या विषयावर होती. बैठकीत राजकीय चर्चा फार झाली नाही. देशातील बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांचे इतर मुद्दे. यातून बाहेर कसे पडता येईल, यावर आज चर्चा झाली. आता आम्ही इतर विरोधी पक्षांशी चर्चा करणार आहोत, यानंतर सर्वांचे मत जाणून घेतल्यानंतर आम्ही एक संयुक्त बैठक घेऊन आमचा अजेंडा मांडू, अशी माहिती शरद पवारांनी दिली.

आम्ही लोकशाहीसाठी लढणार- के. चंद्रशेखर राव
विरोधी पक्षांना भारतीय जनता पक्षाविरोधात एकत्र येण्याचं आवाहन केल्यानंतर आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली. के. चंद्रशेखर राव आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. वर्षा निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांना भेटून आनंद झाला. उद्धव ठाकरे आणि आमचं अनेक विषयावर एकमत असल्याची माहिती के. चंद्रशेखर राव यांनी यावेळी दिली. तसेच परिवर्तनाच्या मुद्द्यावर आमचं एक मत असल्याचं देखील के. चंद्रशेखर राव यांनी सांगितलं. महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ आहेत. दोन्ही राज्यांमध्ये हजार किलोमीटरचे अंतर असले तरी दोन्ही राज्यात चांगले संबंध आहेत, असं के. चंद्रशेखर राव यांनी सांगितलं.

आम्ही आणखी काही पक्षांच्या नेत्यांसोबत देशातील परिस्थीतवर चर्चा करणार आहे. महाराष्ट्रातून जी गोष्ट होते, ती पुढे खूप मोठी होते. लोकशाहीसाठी आम्ही लढणार आहोत. याची सुरूवात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून सुरू केली आहे, असं के. चंद्रशेखर राव यांनी सांगितलं.
देशात सुडाचे राजकारण सुरु झाले आहे. आमचे राजकारण तसे नाही. या गोष्टी अशाच सुरु झाल्या तर देशाचं भवितव्य काय? सूडाचं राजकारण करणे ही आमची परंपरा नाही. सूडाचे राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही. देशात परिवर्तन होण्याची गरज आहे. परिवर्तनाच्या मुद्द्यावर आमचे एकमत झाले आहे. देशातील राजकारण विकासकामांवर चर्चा झालीअशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे, के. चंद्रशेखर राव आणि इतरांनी मुंबईतील बैठक संपल्यानंतर फोटोसाठी पोझ दिली. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह अभिनेते प्रकाश राजही उपस्थित होते.
दरम्यान, के. चंद्रशेखर राव यांनी भाजपवर निशाणा साधत भाजपला देशातून हद्दपार करा अन्यथा देश उद्ध्वस्त होईल, असं वक्तव्य केलं आहे. भाजपला सत्तेतून हटवण्यासाठी राजकीय शक्तींनी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. भाजपच्या विरोधात विविध विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केसीआर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटण्याची योजना आखत असल्याची माहिती समोर आली आहे.




