Top Newsस्पोर्ट्स

बुमराह नडला, सिराज थेट भिडला; क्रिकेटच्या पंढरीत भारताचा इंग्लंडवर थरारक विजय

लंडन : कसोटी क्रिकेटची रोमहर्षकता काय असते ते क्रिकेटच्या पंढरीत अर्थात लॉर्ड्सवरील सामन्यातून पाहायला मिळाली. अतिशय रंगतदार ठरलेल्या लॉर्ड्स कसोटीत टीम इंडियानं एकहाती वर्चस्व गाजवले. अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या अनुभवी जोडीनं ऐतिहासिक खेळी करताना संघाला विजयाचे स्वप्न दाखवले. पाचव्या दिवशी जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांनी अनपेक्षित फलंदाजी करत सकाळच्या सत्रात इंग्लंडच्या गोलंदाजांना हतबल केले. त्यामुळेच कर्णधार विराट कोहलीच्या चेहऱ्यावरील गायब झालेला आनंद परतला. मोईन अली अन् जोस बटलर यांनी टीम इंडियाच्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, परंतु मोहम्मद सिराजनं दोन चेंडूवर दोन विकेट्स घेत इंग्लंडला बॅकफूटवर फेकले. विराटनं ज्याचा झेल सोडला तो जोस बटलर भारताच्या मार्गात अजूनही उभा होताच. सिराजनं त्याचाही अडथळा दूर केला. भारतानं लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय मिळवला.

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित सुटला. त्यानंतर ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानात आज भारताने इंग्लंडवर १५१ धावांनी मात करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. पहिल्या डावातील भारताच्या ३६४ धावांच्या बदल्यात इंग्लंडने ३९१ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर इंग्लंडच्या २७ धावांच्या आघाडीचा पाठलाग करत भारताने अजिंक्य रहाणे आणि मोहम्मद शमीच्या अर्धशतकांच्या जोरावर २९८ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर इंग्लंडला ६० षटकांमध्ये २७२ धावांचं लक्ष्य दिलं. परंतु भारताने दिलेलं हे आव्हान इंग्लंडच्या फलंदाजांना पेलवलेलं नाही. भारतीय गोलंदाजांनी ५१.५ षटकांमध्ये अवघ्या १२० धावांत इंग्लंडचे सर्व फलंदाज बाद करत या रोमहर्षक सामन्यात विजय मिळवला आहे. भारताकडून या डावात मोहम्मद सिराजने ४, जसप्रीत बुमराहने ३, इशांत शर्माने २ आणि मोहम्मद शमीने १ विकेट घेतली. दरम्यान, पहिल्या डावात शतक ठोकणाऱ्या लोकेश राहुलला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

या ऐतिहासिक सामन्यात टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूने त्याचं योगदान दिलं आहे. पहिल्या डावात लोकेश राहुलने शतक ठोकलं. तर रोहित शर्माने ८३ धावांची जबरदस्त खेळी केली. तर दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने चिवट फलंदाजी करत शतकी भागीदारी केली. रहाणेने मोठ्या कालावधीनंतर अर्धशतक ठोकलं. तसेच अखेरच्या सत्रात मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरहाने मोठी भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. तसेच गोलंदाजांनीदेखील दोन्ही डावात निर्णायक भूमिका बजावली. पहिल्या डावात मोहम्मद सिराजने ४, इशांत शर्माने ३, मोहम्मद शमीने २ बळी घेतले. तर दुसऱ्या डावात सिराजने पुन्हा एकदा ४ विकेट घेतल्या.

लॉर्ड्स कसोटीच्या पाचव्या दिवशी टीम इंडियाच्या अखेरच्या फलंदाजांनी कमाल केली आहे. ज्यांच्या खांद्यावर टीम इंडियाच्या गोलंदाजीची धुरा आहे, त्यांनी फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला अक्षरक्ष: रडवलं. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या जोडीने नवव्या विकेटसाठी भारताकडून विक्रमी भागीदारी केली. या दोघांनी ३९ वर्षांपूर्वीचा लॉर्ड्सवरील रेकॉर्ड मोडीत काढला आहे. बुमराह आणि शमी दोघांनी लंचब्रेकपर्यंत ९१ धावांची नाबाद भागीदारी केली. या दोघांनी ६६ पेक्षा अधिक धावांची भागीदारी करताच हा रेकॉर्डब्रेक केला आहे. भारताकडून लॉर्ड्सवर मदन लाल आणि कपिल देव यांनी १९८२ मध्ये ९ व्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली होती.

https://twitter.com/SonyLIV/status/1427325232742735878

दुसऱ्या डावात भारताची अत्यंत खराब सुरुवात झाली होती. पहिल्या डावात शतक ठोकणारा सलामीवीर के. एल. राहुल दुसऱ्या डावात ५ धावा करुन बाद झाला. पाठोपाठ २१ धावा करुन रोहित शर्मादेखील माघारी परतला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली २० धावांवर असताना सॅम करनची शिकार ठरला. भारतीय संघ पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेल्यानंतर भारताचा डाव भरवशाचे फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या जोडीने सावरला. या जोडीने तब्बल २९७ चेंडूत शतकी भागीदारी रचून भारताचं या सामन्यातील आव्हान जिवंत ठेवलं. रहाणेने मोठ्या कालावधीनंतर अर्धशतक फटकावलं. त्याने १४६ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली, तर पुजाराने ४५ धावांची खेळी केली.

मोहम्मद शमीने लॉर्ड्सच्या या ऐतिहासिक मैदानावर षटकार ठोकत अर्धशतक साजरं केलं. शमीच्या कसोटी कारकिर्दीतील हे दुसरं अर्धशतक ठरलं आहे. विशेष म्हणजे ही दोन्ही अर्धशतकं शमीने इंग्लंड विरुद्ध इंग्लंडच्याच मैदानात फटकावली आहेत. याआधी शमीने २०१४ मध्ये नॉटिंगघममध्ये अर्धशतक लगावलं होतं.

लक्ष्याचा पाठलाग करायला मैदानावर उतरलेल्या इंग्लंडला जसप्रीत व शमी यांनी पहिल्या व दुसऱ्या षटकात धक्के दिले. रोरि बर्न्स व डॉम सिब्ली हे दोन्ही सलामीवीर शून्यावर माघारी परतले. हसीब हमीद याला रोहित शर्माकडून जीवदान मिळाले, परंतु त्याचा फार मोठा फटका टीम इंडियाला बसला नाही. इशांत शर्मानं त्याची विकेट घेतली आहे. इशांतनं त्यापाठोपाठ जॉनी बेअरस्टोला ( २) पायचीत करून चौथा धक्का दिला. टी ब्रेकनंतर जसप्रीतनं भारताला हवी ती विकेट मिळवून दिली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट ३३ धावांवर विराटच्या हाती झेल देऊन माघारी परतला. आता इंग्लंडची पराभव टाळण्याची परीक्षा खऱ्या अर्थानं सुरू झाली. अखेरच्या एका तासाच्या खेळात टीम इंडियाला विजयासाठी ३ विकेट्स हव्या होत्या, तर इंग्लंडला पराभव टाळण्यासाठी ९० चेंडू खेळून काढायची होती. एकेक षटक कमी होत होतं अन् विराटचं टेंशन पुन्हा वाढत जात होतं. विराटनं स्लेजिंग करून इंग्लंडच्या फलंदाजांची एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्नही केला. विराटनं आक्रमक क्षेत्ररक्षण लावत दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ५१व्या षटकात जसप्रीतनं राऊंड दी विकेट गोलंदाजी करताना ऑली रॉबिन्सनला पायचीत केले. रॉबिन्सननं ३५ चेंडूंत ९ धावा केल्या. आता भारताला ५५ चेंडूंत २ विकेट्स घ्यायच्या होत्या. पुढच्याच षटकात सिराजनं इंग्लंडची अखेरची होप बटलरला ( २५ धावा ९६ चेंडू) बाद केले. सिराजनं जेम्स अँडरसनची विकेट घेत भारताला १५१ धावांनी विजय मिळवून दिला. इंग्लंडचा डाव १२० धावांवर गडगडला.

लॉर्ड्सवर बाजी मारणारा तिसरा भारतीय कर्णधार

कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा ३७ वा कसोटी विजय ठरला. यासह त्यानं क्लाईव्ह लॉईड यांचा विक्रम मोडला. ग्रॅमी स्मिथ ( ५३), रिकी पाँटिंग ( ४८), स्टीव्ह वॉ ( ४१) हे विराटच्या पुढे आहेत. भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक विजयांमध्ये विराट टॉपवर आहे. लॉर्ड्सवर भारताचा हा तिसरा कसोटी विजय आहे. यापूर्वी १९८६ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतानं ५ विकेट्स राखून विजय मिळवला होता, त्यानंतर २०१४नंतर महेंद्रसिंग धोनीच्या संघानं ९५ धावांनी विजय मिळवला होता. विराटच्या संघानं मिळवलेला विजय हा लॉर्ड्सवरील मोठा विजय ठरला. लॉर्ड्सवर मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार जिंकणारा लोकेश राहुल हा चौथा भारतीय ठरला. यापूर्वी दीलीप वेंगसरकर १९७९, कपिल देव १९८६ आणि इशांत शर्मा २०१४ यांनी हा मान पटकावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button