कोरोना बेड घोटाळ्याला तेजस्वी सूर्या यांच्याकडून ‘धार्मिक रंग’; चौकशीचे आदेश
बंगळुरू : भारतीय जनता पक्षाचे वादग्रस्त खासदार तेजस्वी सूर्या पुन्हा एकदा चर्चेत आहेत. सूर्या यांनी कोविड रुग्णांसाठी कोविड बेड घोटाळ्यासंबंधी बंगळुरू महानगरपालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यासंबंधी, तेजस्वी सूर्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर कर्नाटक सरकारनंही या कारवाई सुरू केलीय.
सहआयुक्त संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पोलिसांत दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे. या प्रकरणी एका महिलेसहीत चार जणांना अटक करण्यात आलीय. भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांचे यासंबंधी काही व्हिडिओ समोर आलेत. यातील एका व्हिडिओत सूर्या आपले कुटुंबीय रवी सुब्रमण्य आणि सतीश रेड्डी यांच्यासोबत महापालिकेच्या दक्षिण वॉररुममध्ये असलेल्या १७ मुस्लीम स्टाफच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत होते. ‘हे लोक कोण आहेत? त्यांना कुणी नियुक्त केलं? कशी झाली त्यांची नियुक्ती?’ असं म्हणतानाही तेजस्वी सूर्या या व्हिडिओत दिसत आहेत.
भाजप नेते आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी बंगळुरू महानगरपालिकेच्या वॉररुममध्ये १७ मुस्लीम कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना या प्रकरणाला ‘धार्मिक रंग’ देण्याचाही प्रयत्न केला आहे. सूर्या यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर राज्यात राजकीय वातारवणही तापलंय. या आरोपाच्या झळा महानगरपालिका आयुक्त सरफराज नवाज यांच्यापर्यंतही पोहचल्यात. माझ्यावर आरोप करतानाचा या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय यासाठी मला दु:ख होतंय, अशी प्रतिक्रिया नवाज यांनी व्यक्त केलीय. बेड वाटप प्रक्रियेशी आपला काहीही संबंध नाही. कोविड केअर सेंटर आणि कचरा व्यवस्थापनावर आपण देखरेख करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान, बुधवारी सूर्या यांनी आपण नवाझ यांच्या नावाचा उल्लेख केला नसल्याचं स्पष्टीकरण देतानाच माफीही मागितलीय.