Top Newsराजकारण

उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमावर शिवसेनेचाच बहिष्कार; मुख्यमंत्र्यांची सेनेच्या नेत्यांना चपराक

रायगडच्या पालकमंत्री हटाव मोहिमेवरून नाराजीनाट्य

अलिबाग : अलिबाग-उसर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित असूनही जिल्ह्यातील आमदारांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकत पक्षांतर्गत नाराजी चव्हाट्यावर आणली. जिल्हा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन साेहळ्याला तिन्ही आमदारांसह कार्यकर्त्यांनी दांडी मारत मुख्यमंत्र्यांनाच कोंडीत पकडले. त्याचवेळी ठाकरे यांनी मात्र ही मोहीम उघडणाऱ्यांची दखल न घेता पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक करत पक्षातील तिन्ही बंडखोर आमदारांना एकप्रकारे चपराक लगावली.

ज्या कार्यक्रमांना पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे असतील, त्या कार्यक्रमांना जिल्ह्यातील शिवसैनिक जाणार नाहीत, असे अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी आधीच घोषित केले होते. आदिती काेणालाच विश्वासात घेत नाहीत, कामात सातत्याने लुडबुड करतात. त्यामुळे शिवसेनेत असलेली नाराजी काही दिवसांपूर्वी बाहेर पडली. पक्षाचे आमदार महेंद्र दळवी, भरत गाेगावले आणि महेंद्र थाेरवे यांनी पालकमंत्री हटाव मोहीम सुरू केली. मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले. त्यावर पक्षाने काहीही निर्णय घेतला नसल्याने जिल्हा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन साेहळ्याला तिन्ही आमदारांसह कार्यकर्त्यांनी दांडी मारली.

ठाकरे यांनी ऑनलाइन उपस्थित राहात पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या कामाची प्रशंसा केली. काम पूर्णत्वास नेणे ही आदिती तटकरे यांची खासियत आहे. अमुक काम करा, तमुक काम करा असे सर्वच सांगतात; परंतु त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन पार पाडले, अशा शब्दांत स्तुती करत त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना इशाराच दिल्याचे मानले जाते.

कार्यक्रम महाविकास आघाडीचा आहे, मुख्यमंत्री हेदेखील आमचेच आहेत; परंतु जिल्ह्यातील कारभारामध्ये पालकमंत्री आदिती तटकरे यांची लुडबुड सुरू आहे. याविराेधात आमदार महेंद्र थाेरवे, आमदार भरत गाेगावले यांच्यासह मी स्वत: पालकमंत्री हटावची माेहीम हाती घेतली आहे. त्यामुळे आम्ही या कार्यक्रमाला गैरहजर राहिलाे, असे आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button