Top Newsराजकारण

शिवसेना काँग्रेससोबत उत्तर प्रदेश, गोवा विधानसभा निवडणूक एकत्र लढणार?

संजय राऊतांची प्रियंका गांधींसोबत तासभर चर्चा

नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. १० जनपथ या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी दोन नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या बैठकीत उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्यावर चर्चा झाली, अशी माहिती राऊत यांनी दिली.

संजय राऊत यांनी मंगळवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर बुधवारी त्यांनी प्रियंका गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी बैठक सकारात्मक होती असं सांगतलं. तसंच, आम्ही उत्तर प्रदेश आणि गोव्यात एकत्र काम करण्याचा विचार करत आहोत, असं देखील सांगितलं.

संजय राऊत यांनी मंगळवारी राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा झाली. त्यानंतर राऊत यांनी मीडियाशी संवाद साधत काँग्रेसशिवाय कोणताही फ्रंट अस्तित्वात येऊच शकत नसल्याचे सांगितले. देशात एकच फ्रंट असेल. तीन चार फ्रंट निर्माण केल्याने भाजपला पर्याय दिला जाऊ शकणार नाही. या फ्रंटच्या नेतृत्वाचे नंतर ठरेल. पण फ्रंट एकच असेल, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाला सांगितले.

काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडी होऊ शकत नाही. नवी आघाडी झाली तरी काँग्रेसच्या नेतृत्वातही एखादी आघाडी काम करेलच. काँग्रेससोबत अनेक पक्ष आहेत. ते काँग्रेसच्या नेतृत्वात जातील. त्यामुळे तीन तीन फ्रंट हवेत कशाला? काय करणार एवढे फ्रंट करून? अशाने भाजपला आपण पर्याय देऊ शकणार नाही, असे राऊत म्हणाले. विरोधकांची एक बैठक बोलावण्याचा प्रयत्न सुरू आहे. या कामी तुम्ही पुढाकार घ्यावा अशी विनंती मी राहुल गांधींना केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button