
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील कलगीतुरा दररोज पाहायला मिळत आहे. एकमेकांवर आरोप आणि टीका करायची संधी दोघेही सोडत नाहीत. पत्रकार परिषदेत एकमेकांवर बोलल्याशिवाय दोन्ही नेत्यांचा सध्यातरी दिवसच संपत नाही, असे दिसून येत आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून चंद्रकांत पाटील यांच्यावर बोचरी टीका केली होती. चंद्रकांत पाटलांच्याच तोंडाला फेस आल्याचं ते म्हणाले होते. त्यानंतर, आता चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपयांच्या मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचं ते म्हणाले.
संजय राऊत हे आपणाविरुद्ध सव्वा रुपयांचा खटला दाखल करणार असल्यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर, पाटील यांनी उत्तर दिलंय. संजय राऊत हे माझे मित्र आहेत, त्यामुळे ते जे मानहानीचा दावा दाखल करणार आहेत, तो त्यांनी वाढवावा. मानहानीचा दाव्याची रक्कम वाढवावी, कारण, त्यांचा मान फक्त सव्वा रुपयांचा नाही, त्यांच्या मानहानीची किंमत त्यांनी ठरवावी, पण ती सव्वा रुपया नक्कीच नाही, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना चिमटा काढला आहे. तसेच, मला जेव्हा संधी मिळेल की, सातत्याने रोज बोलणारे, रोज लिहिणारे, हॉस्पीटलमध्ये भरती झाल्यावर सुद्धा, या नावाचा जर अवॉर्ड द्यायचा आहे, तर मी तो अवॉर्ड संजय राऊत यांना देईल, असे म्हणत टोलाही लगावला.




