सचिन वाझेच्या एनआयए कोठडीत ३ एप्रिलपर्यंत वाढ
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं ठेवल्याप्रकरणी आणि मनसुख हिरेन हत्यप्रकरणी संशयित आरोपी आणि निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेच्या एनआयए (NIA) कोठडीत वाढ झाली आहे. सचिन वाझेची पुन्हा एकदा ३ एप्रिलपर्यंत एनआयएच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. यावेळी तपासात सहाकार्य केल्याचा दावा करत वाझेने पुन्हा एकदा एनआयए कोठडी नको, अशी विनंती केली आहे. तसेच यादरम्यान वकिलांचा युक्तीवादही झाला. शिवाय याप्रकरणाची आणखी माहिती जाणून घेण्यासाठी एनआयएने १५ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. पण तरी देखील वाझेच्या कोठडीत १० दिवसांची वाढ केली. त्यामुळे आता पुढील तपासादरम्यान आणखी काय खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
दरम्यान स्कॉर्पिओमध्ये धमकीची दोन पत्र सापडली होती. त्यापैकी एक पत्र एएसजी अनिल सिंह यांनी वाचून दाखवलं. ‘अगलीबार यह सब सामान कनेक्ट होके आएगा, समझ जा। तुझे औरी तेरी पुरी फैमेली को उडा ने का बंदोबस्त कर दिया है’ तर दुसऱ्या पत्रात अश्लिल भाषेचा वापर असल्यानं सरकारी वकिलांनी ते भर कोर्टात वाचून न दाखवता, थेट न्यायमूर्तींना सोपवलं.
सचिन वाझेकडे ६२ जिवंत काडतुसे मिळण्याची माहिती कोर्टात एनआयएने दिली आहे. पण या काडतुसांचा वापर कशासाठी हा हेतू अस्पष्ट आहे. वाझे सेवेत आल्यानंतर त्याला ३० काडतुसे देण्यात आली होती. पण या ३० काडतुसांपैकी ५ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. २५ काडतुसे गायब झाल्याचे समोर आले आहे.
मला बळीचा बकरा बनवला : सचिन वाझे
मला बळीचा बकरा बनवला जात आहे” असा आरोप आज सचिन वाझे यांनी विशेष एनआयए कोर्टात केला. एनआयए अधिकाऱ्यांकडून माझी पुरेशी चौकशी झाली आहे. त्यामुळे आणखी कोठडी वाढवून देण्यात येऊ नये, अशी विनंतीही वाझे यांच्यातर्फे कोर्टात करण्यात आली. मात्र, वाझे यांची ही विनंती अमान्य करण्यात आली.
मी अँटिलिया प्रकरणात केवळ दीड दिवस तपास अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर तुझ्याविरोधात पुरावे आहेत आणि तुला अटक करण्यात येत आहे, असे मला अचानक सांगण्यात आले, असा दावाही वाझे यांनी आज कोर्टात केला. मी एनआयए समोर कोणत्याही गुन्ह्याची कबुली दिलेली नाही, असेही वाझे यांनी कोर्टात नमूद केले.