संजय राठोड यांचा राजीनामा अद्याप मुख्यमंत्र्यांच्या खिशातच!
शिवसेनेकडून विरोधकांची फसवणूक; राज्यपालांकडे राजीनामा पत्र आलेच नाही
मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणात अडचणीत आलेल्या संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे दिला. तो अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडेच आहे. मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा स्वीकारला असला तरीही तो अद्याप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा स्वीकारून ३ दिवस होत आले आहेत.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेले शिवसेना नेते संजय राठोड यांनी तीन दिवसांपूर्वी वनमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राठोड यांच्यावर अतिशय गंभीर आरोप झाल्यानं त्यांच्या राजीनाम्यासाठी मोठा दबाव होता. त्यातच सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असल्यानं विधिमंडळात विरोधकांकडून या विषयावरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न होता. त्यामुळेच अधिवेशनाला सुरुवात होण्याच्या एक दिवस आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राठोड यांचा राजीनामा घेतला.
एखाद्या मंत्र्यानं पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवल्यावर मुख्यमंत्री कार्यालय तो राजीनामा राज्यपालांकडे पाठवतं. त्यानंतर राज्यपाल तो राजीनामा स्वीकारतात. त्यानंतर संबंधित मंत्री पदावरून दूर होतो. मग सरकारकडून एक नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं जातं. संबंधित खात्याचा पदभार कोणाकडे सोपवण्यात आला, याची माहिती त्यात असते. मात्र मुख्यमंत्री कार्यालयानं राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवलेलाच नाही. सरकारकडून कोणतंही नोटिफिकेशन काढण्यात आलेलं नाही. वनमंत्रिपदाचा अतिरिक्त पदभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे, याबद्दल सरकारनं नोटिफिकेशन प्रसिद्ध केलेलं नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या संजय राठोड अजूनही वन मंत्रिपदावर कायम आहेत.
राजीनामा केवळ फार्स?
मुख्यमंत्री कार्यालयानं राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला नसल्यानं रविवारी घेण्यात आलेला राजीनामा निव्वळ फार्स होतो का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. सोमवारपासून सुरू असलेल्या अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरू नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा घेतला का, अशी चर्चा रंगू लागली आहे.