शिवसेना भवनवर चाल कराल, तर शिवप्रसाद मिळणारच : संजय राऊत

मुंबई : राम मंदिराच्या मुद्द्यावरून काल शिवसेना भवनासमोर भाजपाचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यानंतर दोन्हीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, काल शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपाला रोखठोक इशारा दिला आहे. शिवसेना भवन हे महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतीक आहे. त्यावर चाल कराल तर शिवप्रसाद मिळणारच असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
शिवसेना भवनासमोर काल झालेल्या राड्याबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, भाजपच्या कार्यकर्त्यांनी काल शिवसेना भवनावर चाल करण्याचा प्रयत्न केला. त्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला. शिवसेना भवन ही केवळ राजकीय वास्तू नाही तर ती महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतीक आहे. त्याकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिले, चाल करून आले तर त्यांना शिवप्रसाद मिळणारच. आता काल मिळालेल्या शिवप्रसादावरच थांबा, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, आमच्यासाठी हा विषय संपला आहे, असा इशाराच संजय राऊत यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि भाजपला दिला.
राऊत पुढे म्हणाले की, राम मंदिर जमीन गैरव्यवहार प्रकरणात भाजपावर किंवा भाजपाच्या नेत्यांवर आरोप झालेले नाही. राम मंदिर ट्रस्ट ही स्वायत्त संस्था आहेत. अस्मितेचं प्रतीक असलेल्या वास्तूवर आरोप होत आहे. त्यावर आरोप होत असेल तर त्याबाबत प्रश्न विचारणे खुलासा मागणे हा गुन्हा आहे का? असा सवालही राऊत यांनी विचारला. तसेच जेव्हा कधी कुणी शिवसेना भवनाकडे डोळे वर करून पाहिले आहे, यापुढे जर शिवसेना भवनाकडे कुणी डोळे वर करून पाहिले तर असेच उत्तर दिले जाईल, असा इशारा, संजय राऊत यांनी दिला.
भाजपानं सांगितलं मोर्चा काढण्याचं कारण
‘सामना’च्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याऐवजी थेट शिवसेना भवनासमोर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन का केले, असा सवाल आता विचारला जात आहे. त्याला आता भाजपकडून उत्तर देण्यात आले आहे.
एका वृत्तवाहिनीच्या विशेष चर्चेमध्ये भाजपाचे आमदार अमित साटम यांनी शिवसेना भवनासमोर आंदोलन का केलं, याचं कारण सांगितलं आहे. ते म्हणाले की, ज्या प्रकारची भाषा सामनामधून वारंवार वापरली जाते. पत्रकारिता ही वेगळी बाब. ही पत्रकारिता नाही. जसे यांचे शिवसैनिक आवेशात येतात तसे आमचे भाजयुमोचे कार्यकर्तेही आवेशात येतात. त्यामुळे वारंवार होणारे असे ‘बिलो द बेल्ट’ हल्ले सुरू होते ते कुठेतरी भाजयुमोच्या युवा कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागले होते. तुम्ही एकदा लिहाल दोनदा लिहाल. मात्र दहाव्यांदा लिहिल्यावर अकराव्या वेळी कुठला ना कुठला कार्यकर्ता प्रतिक्रिया देणारच, असे अमित साटम यांनी सांगितले.
दरम्यान, शांततापूर्वक, लोकशाहीच्या मार्गाने भाजयुमोचा कार्यकर्ता त्याठिकाणी आंदोलन करण्यासाठी गेला होता. त्यांनी तिथे आंदोलन केलं. त्यांना अटक झाली. मात्र त्यानंतर त्या ठिकाणी तीनचार कार्यकर्ते वेगळे उभे होते. त्यात एक महिला होती. तेव्हा उर्वरित कार्यकर्ते गेल्यानंतर पोलिसांच्या आडून ५०-६० जणांच्या जमावाने या तीन चार जणांवर हल्ला केला, ही वस्तुस्थिती आहे. जसे यांचे शिवसैनिक आवेशात येतात तसे आमचे कार्यकर्तेही आवेशात येतात. जसं यांना लागतं, तसं आमच्या लोकांनाही लागतं. गेल्या सहा सात वर्षांत शिवसेनेकडून होणारी टीका अनेकदा सहन केली आहे. शिवसेनेकडून सत्तेत असतानाही भाजपाच्या नेत्यांवर बिलो द बेल्ड हल्ले सुरू होते. मात्र अशी टीका होऊनही कार्यकर्ते शांत होते. मात्र कधीनाधील अशा संतापाचा उद्रेक होतो, तो काल झाला, असे भाजपा आमदार अमित साटम यांनी सांगितले.




