इतर

सचिन वाझेंसोबत ‘एनआयए’ पथकाचा लोकल प्रवास

मुंबई: अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणातील मुख्य संशयित सचिन वाझे (Sachin Waze) यांना घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA – ‘एनआयए’) अधिकाऱ्यांनी सोमवारी मुंबईतील लोकल ट्रेनने प्रवास केला. 4 मार्च रोजीच्या घटनांचे नाट्यरुपांतरण करण्यासाठी सचिन वाझे यांना छत्रपती शिवाजी महाराज (CSMT) आणि कळवा रेल्वे स्थानकात नेण्यात आले होते.

सोमवारी रात्री साधारण सव्वाअकराच्या सुमारास ‘एनआयए’चे अधिकारी वाझे यांना घेऊन मुंबईतील कार्यालयातून बाहेर पडले. त्यानंतर साडेअकरा वाजता हे सर्वजण सीएसएमटी स्थानकात दाखल झाले. याठिकाणी फलाट क्रमांक ४ आणि ५ वर सचिन वाझे यांना नेऊन ४ मार्चच्या रात्री काय घडले होते, याची नेमकी माहिती ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार साचिन वाझे यांनी 4 मार्च रोजी सीएसएमटी ते कळवा हा प्रवास लोकल ट्रेनने केला होता. त्यामुळे रात्री 12.15च्या लोकल ट्रेनने ‘एनआयए’ची टीम सचिन वाझे यांना घेऊन कळव्याच्या दिशेने निघाली. साधारण 12.45 च्या सुमारास लोकल ट्रेन कळव्याला पोहोचली. याठिकाणी उतरल्यानंतर ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांनी 30 मिनिटं थांबून 4 मार्चच्या रात्री घडलेल्या घटनांचे नाट्यरुपांतरण (क्राईम सीन रिक्रिएट) केले. हे सगळं आटोपल्यानंतर ‘एनआयए’ची टीम रात्री सव्वाच्या सुमारास सचिन वाझे यांना घेऊन पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाली. रात्री दोन वाजता हे सर्वजण पुन्हा मुंबई ‘एनआयए’च्या कार्यालयात पोहोचले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘एनआयए’च्या हाती आणखी एक सीसीटीव्ही फुटेज लागले आहे. त्यामध्ये साचिन वाझे यांनी 4 मार्च रोजी सीएसएमटी ते कळवा प्रवास केला होता. यापूर्वी सचिन वाझे यांना घेऊन ‘एनआयए’ने अँटलिया आणि अन्य परिसरात क्राईम सीन रिक्रिएट केले आहेत. या माध्यमातून ‘एनआयए’ अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणाचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button