विकत घेतलेल्या लसीचे १५० रुपये केंद्राच्याच तिजोरीत जातात : महापौर पेडणेकर
मुंबई : सध्या लसीच्या मुद्द्यावरुन राज्य सरकार आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायेत. मुंबईकरांना मोफत लस द्या अश्या मागणीसाठी भाजप नगरसेवकांनी काल महापालिकेतल्या महापौर दालनाबाहेर आंदोलन केलं होतं. मात्र, या आंदोलनाला प्रत्युत्तर देताना भाजपच्या नेत्यांचा अभ्यास कमी पडतोय अशी खोचक टिप्पणी करत विकत घेतल्या जाणाऱ्या लसीचे १५० रुपये केंद्राकडेच पाठवावे लागतात असा खुलासा केला आहे.
मुंबईकरांना मोफत लस मिळावी यासाठी माझ्या केबीनबाहेर आंदोलन करण्याऐवजी केंद्राला हे १५० रुपये घेऊ नका असं सांगण्यास मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी भाजप नगरसेवरकांना सुचवले. खाजगी हॉस्पिटलमध्ये जी लस लोक २५० रुपयांना विकत घेतात त्यातील १५० रुपये केंद्राला जातात आणि १०० रुपये खाजगी हॉस्पिटल त्यांच्या व्यवस्थापनासाठी घेते. याव्यतिरीक्त महापालिका आणि राज्य सरकारच्या शासकिय लसीकरण केंद्रावर मोफत लसीकरण होते.
आठवड्याच्या सुरुवातीला तीन दिवस पालिकेने लसीकरण केंद्रावर ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला अथवा दुसरा डोस मिळणार नाही असे घोषित केले होते. याआधीही लसींची कमतरता असल्यामुळे सर्व खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरण पूर्णत: थांबवले होते. त्यामुळे गेले १० दिवस शासकीय केंद्रांवर लसीकरणासाठी प्रचंड गर्दी उसळली. यामध्ये वरीष्ठ नागरिकांचे बरेच हाल झाले. लसीकरण केंद्रावरील उसळलेल्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून लसीकरणाच्या प्राथमिक उद्दिष्टास हरताळ फासला जात आहे. तरीही वस्तुस्थिती लक्षात घेता महापालिकेकडून तातडीने सर्वांना मोफत लसीकरण करून मुंबईकरांचे प्राण वाचवण्याची मागणी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली होती.