ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश टिकवून दाखवा; पंकजा मुंडेंचे ठाकरे सरकारला आव्हान

औरंगाबाद : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश न्यायालयात टिकवून दाखवा आणि त्यानुसार निवडणुका घेऊन दाखवा, असावं आव्हान माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारला ललकारलं आहे. ओबीसींना आरक्षण मिळालं नाही, तर ओबीसी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय. औरंगाबादेत आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडीवर तोफ डागलीय.
ओबीसी आरक्षणावरुन पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारला थेट आव्हानच दिलं. तुम्ही जो ओबीसींसाठीचा अध्यादेश काढला आहे. तो टिकवून दाखवा. तुम्ही हा अध्यादेश टिकवून दाखवला तर आम्ही तुमचं कौतुकच करू, असंही त्या म्हणाल्या. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही अन्याय खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मोदींनी दहा टक्के आरक्षण दिलं आहे. ज्यांची आर्थिक ताकद नाही त्या सवर्णांनाही आरक्षण दिलं. देशातील २२ राज्यात आपली सत्ता आहे. या राज्यांनी निर्णय घेऊन बहुजनांना न्याय दिला. मी मंत्री असताना माझ्याकडे या गोष्टी येत होत्या. त्यावेळी ओबीसींचं ५० टक्क्यांवरचं आरक्षण धोक्यात आलं होतं. हे सरकार आल्यानंतर ५० टक्क्यांच्या खालचंही आरक्षण संपुष्टात आलं. ही लाजीरवाणी गोष्ट आहे. लोकांमध्ये संताप आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. भाजपच नाही तर ओबीसीही रस्त्यावर उतरला आहे. निवडणुका आहेत म्हणून अध्यादेश काढला. तोच आधी काढला असता तर. ज्या निवडणुका झाल्या त्यातही ओबीसींना फायदा झाला असताना, असंही मुंडे म्हणाल्या.
मी आधीच उपाशी आणि त्यात उपवास, बहुजनांची अवस्थाही अशीच आहे. गोपीनाथ मुंडे म्हणायचे ज्याला जातीची आणि मातीची लाज वाटते त्यांचा काही उपयोग नाही. ज्यांना जातीची आणि मातीची लाज वाटते आशा लोकांना राजकारणात उभं राहण्याची आवश्यकता नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. जातीवाद पूर्वीही होता, जातीवाद आताही आहे. गावामध्ये गेल्यावर जातीवादाच्या भिंती अजूनही दिसतात. संतांच्या महाराष्ट्रात आज ओबीसींची अशी अवस्था का? असा सवालही त्यांनी केलाय.