Top Newsराजकारण

पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची दिलगिरी

नवी दिल्ली : पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींचा ताफा निदर्शकांनी तब्बल १५ ते २० मिनिटे अडवल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधांनांना आपला दौरा रद्द करावा लागला. त्या प्रकारावरुन सुरु झालेलं राजकारण अजूनही निवळताना दिसत नाही. ‘तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, मी जिवंतपणे दिल्लीला जाऊ शकलो’, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी यांना दिला होता. त्यानंतर आज चरणजितसिंग चन्नी यांनी दौऱ्यावेळी झालेल्या प्रकारावर दिलगिरी व्यक्त केली आहे.

देशातील वाढत्या कोरोनाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज चर्चा केली. या बैठकीला ३० राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारी पंजाब दौऱ्यामध्ये आढळलेल्या सुरक्षेतील त्रुटींनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी आमने सामने आले. या वेळी चन्नी यांनी झालेल्या प्रकरावर खेद व्यक्त केला. चन्नी म्हणाले, आपल्या दौऱ्यादरम्यान जे काही झालं त्याबद्दल मला खेद आहे, असं ते पंतप्रधानांशी बोलताना म्हणाले. मी तुमच्यासाठी एक शेर सांगू इच्छितो, ‘तुम सलामत रहो कयामत तक और खुदा करे कि कयामत ना हो.’

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाब दौऱ्यावर होते. मोदींच्या दौऱ्याला पंजाब पोलिसांनी ग्रीन सिग्नलही दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा बुधवारी फिरोजपूरमध्ये आंदोलकांनी नाकेबंदी केल्यामुळे उड्डाणपुलावर अडकून पडला होता. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान मोदींची यांचा दौरा रद्द करण्यात आला होता. कृषी कायदा रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला पंजाब दौरा होता. पंतप्रधान मोदी पंजाबमधील जनतेला संबोधित करणार होते. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे देखील या रॅलीत सहभागी होणार होते. गृहमंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या वक्तव्यात म्हटलं की, बुधवारी सकाळी पंतप्रधान मोदी भटिंडा येथे दाखल झाले, तेथून ते हुसैनवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. परंतु, पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे पीएम मोदींना सुमारे 20 मिनिटे प्रतीक्षा करावी लागली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button