कोरोनाचा कहर : पंतप्रधान मोदी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
नवी दिल्ली : कोरोनाचा दिवसेंदिवस वाढणारा प्रादुर्भाव आणि कोरोना लसीकरणाबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार, दि. १७ मार्च रोजी महत्वाची बैठक बोलावली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. त्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लसीकरणावर चर्चा होणार आहे. ही बैठक 17 मार्च रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.
भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 26 हजार 291 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 कोटी 13 लाख 85 हजार 339 वर पोहोचली आहे. आजच्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 85 दिवसांत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी 20 डिसेंबर रोजी एका दिवसात 26 हजार 624 रुग्ण आढळून आले होते.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. मागील 24 तासात महाराष्ट्रात एकूण 15 हजार 51 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीय. याशिवाय 10 हजार 671 रुग्ण उपचारानंतर बरे झालेत, तर 48 रुग्णांचा मृत्यू झालाय. यासह राज्यातील एकूण सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 30 हजार 547 इतकी झालीय. राजधानी मुंबईत मागील 24 तासात (15 मार्च सायंकाळी 6 वाजेपर्यंत) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,063 आहे. आजवर बरे झालेले एकूण रुग्ण 3 लाख 18 हजार 642 इतके आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर 92 टक्के आहे. मुंबईत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 14 हजार 582 इतकी आहे. सध्या येथे रुग्ण दुपटीचा दर 165 दिवस आहे.