कोरोना कामात हलगर्जीपणा : नाशिकच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे सक्तीच्या रजेवर
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानंतर कारवाई

नाशिक : नाशिक शहर व जिल्हा कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना आढावा बैठक राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा रुग्णालयातील दिरंगाई आणि गलथान कारभाराबाबत तातडीने आरोग्य मंत्र्यांशी फोनद्वारे संवाद साधला. त्यानंतर तासाभरातच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.
छगन भुजबळ यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी नाशिक जिल्ह्यासाठी २२८ व्हेंटिलेटर प्राप्त झाले असून त्यातील केवळ १९६ व्हेंटिलेटर बसवण्यात आले. त्यातील केवळ ग्रामीण मध्ये सात आणि जिल्हा रुग्णालयात सात असे एकूण १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर रुग्ण उपचार घेत आहे.जिल्हा रुग्णालयात बसवण्यात आलेल्या ८० व्हेंटिलेटर पैकी फक्त ७ व्हेंटिलेटर रुग्णांच्या वापरात होते आणि पैकी ७३ व्हेंटिलेटर हे नॉन कोविड भागात विनावापर पडून आहेत.तसेच २३ व्हेंटिलेटर अद्याप कार्यान्वित न करता तसेच जिल्हाभरात पडून आहेत.व्हेंटिलेटर न मिळाल्याने एकीकडे रुग्ण दगावत असताना दुसरीकडे जिल्हा रुग्णालयातील अशा हलगर्जीपणामुळे पालकमंत्र्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
विभागीय मुख्यालय असलेल्या नाशिक जिल्हा रुग्णालयात केवळ १०० बेड् कोरोनसाठी ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयामधील डेडिक्टेड कोरोना रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले नाही. या हलगर्जीपणा आणि दिरंगाई बाब जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाले नाही.
जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असतांना जिल्हा रुग्णालयाकडून होत असलेल्या दिरंगाई बाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीनंतर तातडीने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क करून ही गंभीर परिस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर तासाभरातच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.
भुजबळांचा संताप
कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यभर वाढत चालला आहे. त्यात नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग झाला आहे. असं असताना शासकीय अधिकारी बेफिकीर असल्याचं चित्र आहे. यावरुन नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ चांगलेच संतापले आहेत. कोरोना प्रादुर्भाव वाढण्यात काही शासकीय अधिकारीही जबाबदार आणि बेफिकीर आहेत असं म्हणत भुजबळ यांनी नाराजी व्यक्त करत त्यांना समज दिली होती.
यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, सिव्हील सर्जन यांनी मीटिंगमध्ये योग्य उत्तरे दिली नाहीत. दोन वेळा आधी त्यांना समज दिली होती. व्हेंटिलेटरची गरज पडत असतांना सिव्हीलमध्ये व्हेंटिलेटरची पडून आहेत. त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी होत्या. आरोग्य मंत्र्यांना आधीच त्यांच्याबाबत सांगितलं होतं. शेवटी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे लागले, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, ही कारवाई बघून इतर अधिकाऱ्यांनी समजून घ्यावं. सगळ्या अधिकाऱ्यांना कालच सांगितलंय कामं जबाबदारीने करा. ही वेळ आराम करण्याची नाही, असंही भुजबळ म्हणाले.