कोलकाता : मुंबई आणि दिल्लीत कोरोना आणि ओमायक्रोनबाधितांची संख्या वाढल्याने पश्चिम बंगाल सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि दिल्लीहून कोलकातासाठी दररोज उड्डाण घेणाऱ्या विमानांवर आता बंदी घालण्यात आलीय. पश्चिम बंगाल सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि दिल्लीहून कोलकाता विमानतळावर येणाऱ्या विमानांना आठवड्यातील फक्त दोन दिवसांसाठीच परवानगी दिली आहे. या दोन्ही शहरांमधून येणाऱ्या विमानांना फक्त सोमवार आणि शुक्रवारसाठी परवानगी देण्यात आली आहे. हे नियम ५ जानेवारीपासून लागू होतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
पश्चिम बंगाल सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज नवी नियमावली जारी केली. यामध्ये नाईट कर्फ्यूची देखील घोषणा करण्यात आली. राज्यात रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू राहील, असं सरकारकडून घोषित करण्यात आलं आहे. तसेच राज्यातील सर्व शाळा, कॉलेज, ब्युटी पार्लर, पर्यटनस्थळ, जीम बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच रेस्टॉरंट आणि सिनेमा हॉलसाठी ५० टक्के क्षमतांनी चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र आणि केरळ पाठोपाठ सध्या पश्चिम बंगाल राज्यात कोरोनाचा उद्रेक बघायला मिळतोय. बंगालमध्ये शनिवारी (१ जानेवारी) तब्बल ४५१२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. विशेष म्हणजे त्यादिवसाआधी २३५१ रुग्ण आढळले होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने होतोय, हे स्पष्टपणे दिसतंय. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता बंगाल सरकारने तातडीने राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. राज्यात 3 जानेवारीपासून सर्व शाळा, महाविद्यालय, स्पा, ब्यूटीपार्लर, पार्क, चौपाट्या पूर्णपणे बंद असणार आहेत.
पश्चिम बंगालचे मुख्य सचिव एच.के. द्विवेदी यांनी मिनी लॉकडाऊनबाबत माहिती दिलीय. राज्यातील सर्व खासगी आणि सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी फक्त ५० टक्के उपस्थिती अनिवार्य राहील. तसेच सर्व प्रशासकीय बैठका या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होतील, अशी घोषणा त्यांनी केली.