समृद्धी महामार्गावर अपघातात उद्योजक सुनील हेकरे यांचा मृत्यू
'मर्सिडीज GLS 400D'चा भीषण अपघात; पत्नी, दोन मुले गंभीर जखमी

नाशिक : समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात नाशिकमधील प्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी आणि मुलं गंभीर जखमी झाले आहेत. हेकरे कुटुंबीय हे मर्सिडीज GLS 400D मधून प्रवास करत होते.
मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर खड्डे पडल्याचं समोर आलं. या प्रकारामुळे समृद्धी महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहे. अशातच आता शहापूरजवळ सुनील हेकरे यांच्या कारला अपघात झाला. सुनील हेकरे हे मुंबईहून नाशिकला येत होते. त्यांच्यासोबत त्यांची दोन्ही मुलं आणि पत्नी असे चार जण प्रवास करत होते. हेकरे यांच्याकडे मर्सिडीजची सगळ्यात दमदार GLS 400D ही एसयूव्ही होती. याच एसयूव्हीतून ते प्रवास करत होते. या एसयूव्हीमध्ये सुरक्षेसाठी एकूण ९ एअर बॅग आणि इलेक्ट्रिकल स्टेबल कंट्रोल आणि ADAS फिचर्सने सज्ज आहे. या एसयूव्ही किंमत ही तब्बल १.५० कोटींपेक्षा जास्त आहे.
हेकरे यांचा मुलगा मर्सिडीज चालवत होता. ते जेव्हा शहापूरजवळ पोहोचले असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातात सुनील हेकरे यांची दोन मुले आणि पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. यात एसयूव्ही चालवणाऱ्या त्यांच्या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेकरे आपल्या मर्सिडीजने शहापूरजवळ पोहोचले असताना महामार्गावर पावसाचं पाणी साचलेलं होतं. साचलेल्या पाण्यातून दुसरी गाडी वेगाने गेली. त्यावेळी रस्त्यावर साचलेलं पाणी त्यांच्या कारच्या काचेवर आलं आणि त्यामुळे त्यांचा मुलगा गाडी चालवत असताना त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि त्यानंतर गाडी पलटी होऊन दुसऱ्या लेनमध्ये गेली, अशी प्राथमिक माहिती समोर आली. हा अपघात इतका भीषण होता की, एसयूव्हीचा वेग जास्त असल्यामुळे कंट्रोल करता आली नाही. पलटी होऊन लेन बदलून ती दुसऱ्या लेनवर गेली आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या ग्रीलवर आदळली. याच दरम्याान सुनील हेकरे हे कारच्या बाहेर फेकले गेले, त्यात त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती देण्यात आली आहे. हेकरे यांच्या अपघाती निधनामुळे नाशिकच्या उद्योग क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
समृद्धी महामार्गावर अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. अनेक निष्पांपाचा अपघातात मृत्यू झाला आहे. लेनची शिस्त, ओव्हर स्पीडमध्ये गाड्या चालवणं, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करण्याचे प्रकार समृद्धी महामार्गावर कायम घडत आहे. यातूनच असे अपघात घडत असून हकनाक लोकांचा जीव जात आहे.




