Top Newsराजकारण

योगी सरकारमधील बलाढ्य मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांचा राजीनामा; समाजवादी पक्षात प्रवेश

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला जबर धक्का

लखनौ – योगी आदित्यनाथ सरकारमधील बलाढ्य मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी पदासोबत भाजपचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांनी २०१७ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता. ते पडरौना मतदारसंघातून निवडून आले होते. ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले होते. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा जबर धक्का आहे.

स्वामी प्रसाद मौर्य यांनी तडकाफडकी भाजपला रामराम ठोकल्यानंतर अखिलेश यादव यांची भेट घेच समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर अखिलेश यादव यांनी या पक्षप्रवेशाची ट्विट करत माहिती दिली. त्यात अखिलेश यादव म्हणाले की सामाजिक न्याय आणि समता-समानतेची लढाई लढणारे लोकप्रिय नेते स्वामी प्रसाद मौर्य आणि त्यांच्यासोबत आलेल्या अन्य सर्व नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे समाजवादी पक्षामध्ये स्वागत आहे. उत्तर प्रदेशात सामाजिक न्यायामध्ये इन्कलाब होईल, २०२२ मध्ये परिवर्तन होईल.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयुषमंत्री धर्मसिंह सैनी यांच्यासह भाजपचे ४ आमदार समाजवादी पक्षामध्ये जाऊ शकतात. भाजपला अजून मोठे धक्के बसण्याची शक्यता असून, मंत्री दारा सिंह चौहान हेसुद्धा भाजपला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर कानपूर ग्रामीणमधील भाजप आमदार भगवती प्रसाद सागर हे सुद्धा स्वामी प्रसाद मौर्य यांच्या निवासस्थानी दिसले होते. त्यांच्याबरोबरच भाजप आमदार रोशन लाल वर्मा हेसुद्धा समाजवादी पक्षात जाण्याची शक्यता आहे.

…तर योगी पंतप्रधान पदाचे दावेदार; अखिलेश यादवांचा निशाणा

दरम्यान समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. जर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यंदा देखील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जिंकले तर ते पंतप्रधान पदाचे दावेदार होतील. आतापासूनच डबल इंजिनची टक्कर होते आहे, भाजपवाल्यांनी याचा विचार करावा, असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. पंचायत आजतक या कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘UP+YOGI खूप आहे UPYOGI’, असे म्हणत योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर पलटवार करत अखिलेश यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ‘अनुपयोगी’ म्हटलं आहे. तसेच केंद्र आणि राज्याच्या ‘डबल इंजिन’ विधानावरही निशाणा साधला आहे.

पंचायत निवडणुकांच्या वेळीच जनतेने जळपास निर्णय केला होता. मात्र, सरकारी यंत्रणेमुळे बहुतांश जणांना अर्जही भरता आले नाहीत. निवडणुकी दरम्यान महिलांची साडी ओढणे, कपडे फाडणे आदी घटनांच्या छायाचित्रांमुळे महाभारताची आठवणी झाली होती. अशा घटना लोकशाहीत कधीच कोणी पाहिल्या नाहीत. जिल्हा पंचायत निवडणुकीत ज्या प्रकारे बेईमानी झाली त्याची शिक्षा जनता भाजपला नक्कीच देईल. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने भाजपा सरकार पूर्ण करू शकली नाही. त्यामुळे यंदा जनता भाजपला राज्यातून हद्दपार करणार आहे, असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.

…तर मोदी राष्ट्रपती होतील, तर योगी आदित्यनाथ पंतप्रधान : टिकैत

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. टिकैत हे वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टिकैत यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी निशाणा साधला आहे. योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री होतील काय़? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला खोचक पद्धतीने उत्तर दिलं आहे. त्यांना (योगी) पंतप्रधान बनवा… हरकत नाही. हे पंतप्रधान (नरेंद्र मोदी) कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पद सोडतील आणि राष्ट्रपती बनतील. योगी नवे पंतप्रधान होतील. आपला (उत्तर) प्रदेश रिकामा होईल, येथे इतर कोणी तरी नेतृत्व करेल, असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button