1) मनोगत चं.दा. कोल्हापूरकरांचं – आता, परवाच मी म्हटलं ना की, ‘मला माजी म्हणू नका.दोन दिवस वाट पाहा.’ लागला की नाही माझा बाण बरोबर निशाण्यावर ? द्यावी लागली की नाही जाहीर ऑफर ? ‘ जगात भारी कोल्हापुरी.’ म्हणतात ते काही उगीच नाही. आता कोणीतरी दिडशहाणा म्हणतोय की, दोन दिवस संपलेत, आता एक्सटेन्शन द्यावं लागेल म्हणून. अरे,ती बोलायची पध्दत असते. आपण म्हणत नाही का, ‘चार दिवस सासूचे – – ‘ मग का ते मोजून चार दिवस असतात का ? आता बघा म्हणावं , बघता बघता आजीचे माजी होऊन जातील आणि माजीचे आजी होऊन जातील !
2) मनोगत उधोजीराजेंचं – तसे आम्ही बालपणापासूनच धार्मिक वृत्तीचे आहोत. आहोत म्हणजे काय, तर आहोतच मुळी. किंबहुना असायलाच हवं. का नको ? तसे आमचे आजोबा प्रबोधनकार होते. त्यांचा धर्माला, मंदिरांना विरोध होता , पण त्यांचा काळ वेगळा होता. त्यांना सत्ता नव्हती ना मिळवायची. त्यांना लोकांचं प्रबोधन करायचं होतं. ते त्यांनी केलं. आता जे आजोबांनी केलं तेच नातवाने करायचं का ? नातवाने काही वेगळं नको का करायला ? नक्कीच करायला हवं. आमच्या वडीलांमुळे आम्ही व्यवहार चतुर झालो आहोत. आता काळाप्रमाणे बदलायलाच हवं. मंदिरांचं आम्हाला वावडं नाही, आम्ही जातो ना मंदिरात, अगदी सहकुटुंब जातो, पण लोकहितासाठी मंदिरं बंद ठेवावी लागली तर ती बंद ठेवायलाही आमचा विरोध नाही. शेवटी लोकांचा जीव महत्वाचा. ‘ सर सलामत तो पगड़ी पचास !’ . अरे, व्यवहारात काय आणि राजकारणात काय ‘सर सलामत’ नको का ठेवायला ? का नको ठेवायला ? नक्कीच ठेवायला हवं. ते सलामत असलं तर पगडी काय कोणत्याही रंगाची घालता येते. भगवी घातली तरी चालते, दुरंगी घातली, अगदी तिरंगी घातली तरी चालते. पूर्वी आम्ही साधेभोळे होतो , ( असा काही अतिशहाण्यांचा गैरसमज होता. ) पण आता आम्ही कात टाकली आहे. आता आम्ही कालचा, आजचा आणि उद्याचाही विचार करायला लागलो आहोत. आजी सांभाळताना , माजीही सांभाळून भावीची तजवीज आजच करण्याइतका व्यवहारीपणा आता आमच्यात आला आहे. माणसाने मैत्री करावी. जरूर करावी. का करू नये. किंबहुना मी तर म्हणेन की, मैत्री तर करायलाच हवी, भलेच अधूनमधून मित्र बदलावेत, पण मैत्री तर करायलाच हवी. हो, पण मैत्री करतांनाही वाट्टेल तशी मैत्री करून नाही चालणार. अजिबात नाही चालणार. मैत्री करतानाही एक विशिष्ट अंतर राखूनच करायला हवी. रेल्वेच्या रुळांमध्ये कसं समांतर अंतर असतं ना, तसंच अंतर मैत्रीतही राखता आलं पाहिजे , म्हणजे अपघात होत नाही. मधेच ट्रॅक जरी बदलावा लागला ना, तरी थोडा खडखडाट होतो, पण गाडी रुळावरून घसरत नाही. समोरून पाहणाऱ्याला रुळांची गुंतागुंत पाहून असं वाटतं की, आता गाडी नक्कीच रुळावरून घसरेल,पण कसलं काय. गाडी ट्रॅक बदलून अलगदपणे पुढच्या प्रवासाला निघालेली असते. असं असलं तरी आजींना धाकात ठेवायचं म्हणजे माजींना थोडं चुचकारून भावी बनण्याची ऑफर द्यावीच लागते ना ? कधी कधी ‘प्लेटफॉर्म नंबर दो पर आनेवाली कुर्ला फ़ास्ट लोकल अब प्लेटफॉर्म नंबर चार पर आ रही है.’ अशी घोषणा होतेच ना ?आपण कशाला उगाच सगळ्यांशी वाईटपणा घ्या , त्यासाठी बेताल चालणारी लेखणी आणि घसरणारी जीभ असलेले बाळगले आहेत ना पदरी ?
3) मनोगत येवलेकर आर्मस्ट्राँग यांचं – आता कुठे मोकळा श्वास घेत होतो, तोपर्यंत यांनी काय हे आजी, माजी, भावी काढलं ? पाजी कुठले ! काही त्रास देतो आहे का आम्ही ?
4) मनोगत दादांच्या ताईचं – बाबा आहेत ना समर्थ सांभाळायला. हे तर आपला कॅश घेण्यासाठी नंबर यावा आणि बँकेचं कॅश काउंटर बंद व्हावं असं झालं.नावातच यूटर्न आहे ना !
5) मनोगत ताईंच्या दादाचं – हे म्हणजे त्यांच्या मर्जीने आम्ही कधीही आजीचं माजी व्हायचं आणि कधीही माजीचं आजी व्हायचं असं झालं. असं कसं चालेल ? त्याठिकाणी त्यांच्या अशा बोलण्याला मी महत्व देत नाही.