मुक्तपीठ

वो भूली दास्ताँ… 

- मुकुंद परदेशी (संपर्क ७८७५० ७७७२८)

प्राणप्रिय उधोजीराजे,

परवा योगायोगाने आपण दोघंही कोल्हापुरात होतो आणि अचानक तुमचा फोन आला. मोबाईलच्या स्क्रीनवर ‘ स्वीट हार्ट उधोजीराजे कॉलिंग.’ अशी अक्षरं आणि स्क्रीनभर बदामच बदाम उमटले न् माझा माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसेना बाई. तुम्ही म्हणालात की, ‘ मी येतो. एकत्रच फिरुयात.’ आणि माझे पाय जागीच थिजलेत. कोल्हापूरवर जी ‘छप्पर फाड़ के बारिश’ झाली ना, ती मलासुद्धा ‘ छप्पर फाड़ के’ काहीतरी मिळावं म्हणूनच झाली असावी. मी तर आपण दोघांनी वेळात वेळ काढून कोल्हापूरच्या ‘चित्रनगरीत’ एखादं रोमँटिक गाणं गावं आणि जमलंच तर कोणाकडून तरी शूटही करून घ्यावं, असा बेतसुद्धा आखून ठेवला होता. त्या भेटीत आपण काय बोललो असू याची बरीच पतंगबाजी सुरू आहे, पण आपली ‘ आँखों आँखों में’ काय बात झाली हे आपल्या दोघांशिवाय कोणालाच कळलं नाही ! होक्की नाही ?

खरं म्हणजे आता आपल्या पुनर्मिलनाचा क्षण जवळ आला असतांना जुन्या गोष्टी उकरून नको काढायला, पण मला मेलीला नाही ना राहवत. मला सांगा, तुमच्या पिताश्रींना आपल्या संस्कृतीचा केवढा अभिमान होता ! होता की नाही ? आणि तुम्ही मी जिवंत असतांनासुद्धा दुसरा घरोबा केलात ? त्याला घरोबाही म्हणता येणार नाही. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतात हल्ली त्याला. तुमच्याच पिताश्रींच्या शब्दात बोलायचं तर, ‘ नुसता चवचालपणा.’ जाऊ द्या. तुम्ही कसेही असलात तरी मला प्रियच आहात. मला तर वाटलं होतं की, तुम्ही मला हातात धरून गाडीत बसवाल आणि म्हणाल , ‘झालं ते झालं. विसर ते सगळं आणि चल आपल्या घरी.’ पण कसलं काय न् फाटक्यात पाय ! जाऊ द्या. तुम्हीच म्हणालात ना की मी प्याकेजवाला नाही, मी मदत करणारा आहे म्हणून ? मग करा की मला मदत ! मी पूरग्रस्त नसले तरी विरहग्रस्त आहे तुमची. लवकर लक्ष दिलं नाही ना, तर वैफल्यग्रस्तसुद्धा होईन . लक्ष द्या ना गडे. हे पत्र लिहिताना मनात काय काय दाटून आलं आहे कसं सांगू ?

वो भूली दास्ताँ लो फिर याद आ गई
नज़र के सामने घटा सी छा गयी
बड़े रंगीं ज़माने थे, तराने ही तराने थे
मगर अब पूछता है दिल, वो दिन थे या फ़साने थे
फ़क़त इक याद है बाकी, बस इक फ़रियाद है बाकी
वो खुशियाँ लुट गयी लेकिन, दिल-ए-बरबाद है बाकी
कहाँ थी ज़िन्दगी मेरी, कहाँ पर आ गयी
वो भूली दास्ताँ…

सदैव तुमचीच

कमळा नागपूरकरीण

ता.क. – तुमच्यासोबत एक सेल्फी घ्यायची होती मस्तपैकी, पण विसरलेच. जाऊ द्या. आता लवकरच एकत्र तर राहायचं आहे ! होक्की नाही ? – क.ना.

————–

कमळे,

जास्त अंगात घुसू नकोस. तुझी नाटकं पाहून मी काही पाघळणार नाही. होतो एखादवेळी माणूस भावनाप्रधान, पण त्याचा अर्थ तू केलेली छळवणूक मी विसरलेलो नाही. कसा विसरेल ? किंबहुना विसरुच शकत नाही. तुझ्यादृष्टीने आमचं एकत्र राहणं हा चवचालपणा असेल, पण आमचं चांगलं चाललं आहे. आम्ही स्वतंत्र आहोत एकमेकांविरुद्ध काहीही बोलायला. तुझ्यासोबत तर नुसताच जीव गुदमरत होता माझा. तुझ्या गुलामीत जगत होतो मी. नुसता तोंड दाबून बुक्क्यांचा मार ! आणि हिंदी पिक्चरची गाणी काय तुलाच येतात का ?

मेरे दुश्मन तू मेरी दोस्ती को तरसे
मुझे ग़म देने वाले तू खुशी को तरसे
तू फूल बने पतझड़ का, तुझ पे बहार न आए कभी
तेरे गुलशन से ज़्यादा वीरान कोई वीराना न हो
इस दुनिया में तेरा अपना तो क्या, बेगाना न हो
किसी का प्यार क्या तू बेरुख़ी को तरसे

उधोजीराजे

ता. क. – परत मी कुठे दौऱ्यावर आहे ते पाहून नेमकं तिथेच कडमडू नकोस. – उ.रा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button