Top Newsराजकारण

देगलूरमध्ये भाजपला आघाडी द्या आणि माझ्यातर्फे गाव जेवण घ्या; चंद्रकांत पाटलांची खुली ऑफर

नांदेड: जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना आगळी-वेगळी ऑफर दिली. भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्यातर्फे गावजेवण देणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे गाव जेवणात स्वतः सहभागी होणार असल्याचंही पाटील म्हणाले.

देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपने अनेक नेत्यांना देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरवलं आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील बोलत असताना त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या ऑफीरमुळे एकच चर्चा रंगली. भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्यातर्फे गाव जेवण देणार आणि त्यावेळी मी स्वतः उपस्थित असणार, अस पाटील म्हणाले.

देगलूर पोटनिवडणुकीतील आमचे उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारार्थ उपाध्यक्ष डॉ. विठ्ठल कुडमुलवार यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या वेळी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्तेही उपस्थित होते.

भाजपने या निवडणुकीच्या प्रचारासाठी मोठ्या नेत्यांची फळी उतरवली आहे. आतापर्यंत रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, भागवत कराड आणि आशिष शेलार यांच्यासह अनेक नेते प्रचारासाठी आले आहेत. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी देगलूर पोटनिवडणुकीसाठी गावोगावी प्रचार सभा घेतल्या, तर नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हेदेखील जोरदार प्रचार करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button