महाजन-खडसे वाद पेटला; फरदापुरात काय घडलं ते मला माहिती : खडसेंचा गर्भित इशारा
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात व्हायरल ऑडियो क्लीपवरुन सुरु झालेला वाद आता जास्त रंगण्याची शक्यता आहे. कारण महाजन यांनी खडसेंचं मानसिक संतुलन बिघडल्याचं वक्तव्य केल्यानंतर खडसे यांनी देखील त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. “माझी तब्येत एकदम ठणठणीत आहे. गिरीशभाऊ यांना खात्री करायची असेल तर ते करू शकतात”, असं खडसे म्हणाले आहेत. तसेच महाजन यांचा सर्व इतिहास आपल्याला माहिती असून त्यांना राजकारणात जन्माला मी आणलं, असं मोठं विधान खडसे यांनी केलं आहे.
मी जे ऑडिओ रेकॉर्डमध्ये बोललो आहे, जामनेर मतदारसंघातून मला नागरिकांचे फोन येत आहेत. तालुक्यात पाणीटंचाईची समस्या आहे. कोरोनाच्या काळात दिवसेंदिवस तिथे रुग्णांचे अक्षरक्ष: मुर्दे पडत आहेत. नागरिकांच्या अनेक समस्या तालुक्यात आहेत. गिरीश महाजन तिकडे पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी फिरत आहेत. तालुक्यातील नागरिक माझ्याकडे संताप व्यक्त करत आहेत. १९९४, १९९५ मध्ये फरदापूर येथे गिरीश महाजन यांची काय घटना घडली होती ती मला आणि जनतेलाही माहिती आहे. त्यांचा पूर्ण इतिहास मला माहिती आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला.
मुख्यमंत्रीपदाचे स्वप्ने पाहणे काय गैर आहे? गिरीशभाऊंना राजकारणात जन्माला मी आणले. त्यांच्या राजकारणात आर्थिक मदत मी दिली. त्यांच्या प्रचारासाठी गल्लोगल्ली मी फिरलो. म्हणून आज गिरीश भाऊ दिसत आहेत. मी कोणाची हाजीहाजी करत नाही. मी कोणाचे पाय चाटत नाही. त्यामुळे गिरीशभाऊ तुम्ही माझी काळजी करण्याची गरज नाही. पहिले आपल्या मतदारसंघात पाहा, असं सडेतोड प्रत्युत्तर खडसे यांनी दिलं आहे.
एकनाथ खडसे यांच्या दूरध्वनीवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल झाली आहे. या क्लीपमध्ये जामनेरमधील एक ग्रामस्थ पाणी नसल्याची तक्रार एकनाथ खडसे यांना करताना ऐकू येत आहे. त्यावर एकनाथ खडसे यांनी मग मग तुमचा आमदार गिरीश मेला का?, असे वक्तव्य केले. या ऑडिओ कल्पीमध्ये खडसे यांनी गिरीश महाजन यांच्याबाबत अनेक आक्षेपार्ह विधाने केली आहेत. या क्लीपवर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी खडसे यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं वक्तव्य केलं.
गुलाबराव पाटलांचा खडसे, महाजनांना सल्ला
एकनाथ खडसे यांची ऑडिओ क्लीप लिक झाल्याचं मला आत्ताच समजलं. सध्या राज्यावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे सध्यातरी या सगळ्यापासून दूर राहायला हवं, असा सल्ला पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांना दिला.