पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजप माघार घेईल : जयंत पाटील

मुंबई : महाविकास आघाडीच्या सर्व घटकांचा भगीरथ भालके यांना आशीर्वाद आहे. जेव्हापासून महाविकास आघाडी आली आहे, भाजपचा कुठेही विजय झालेला नाही. सगळे एकत्र आल्यावर भाजपचा पराभव होतो ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणूनच काहींनी भाजपची उमेदवारी घेतली नाही. देवेंद्र फडणवीसांनी उमेदवार देणार नाही असं सांगितलं होतं. आपण तीन तारखेपर्यंत वाट पाहू. फडणवीसांवर आताच अविश्वास दाखवणं योग्य होणार नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी आता सुरु झाली आहे. भाजपकडून समाधान औताडे तर राष्ट्रवादीकडून भारत भालकेंचे पुत्र भगीरथ भालके यांना मैदानात उतरवण्यात आलंय.
आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जयंत पाटलांना प्रत्युत्तर दिलं आहे. पंढरपूरच्या उमेदवारीबाबत जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेलं वक्तव्य हास्यास्पद आहे. देवेंद्र फडणँवीस यांनी उमेदवार देणार नाही असा काही शब्द दिल्याचं माहिती नाही. असं असतं तर भाजपनं उमेदवार उभा केला नसता. जयंत पाटील यांचं विधान निराधार आणि तथ्यहीन आहे, असा दावा दरेकर यांनी केलाय. भाजपने उमेदवार दिला आहे आणि तो निश्चितपणे जिंकणार आहे. म्हणूनच वेगवेगळी वक्तव्य करुन दिशाभूल करण्याचं काम सुरु असल्याची टीका दरेकर यांनी जयंत पाटलांवर केलीय.
चंद्रकांत पाटील म्हणतात आम्ही शेतकाऱ्यांच्या प्रश्नावर निवडणूक लढवतोय. वारे रे वा. कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु असताना तुम्ही शेतकऱ्यांचं हित करणार म्हणता? असा सवाल जयंत पाटलांनी विचारला. तसंच निवडणुका झाल्यानंतर पंढरपूर मतदारसंघातील प्रश्न घेऊन अजितदादांसोबत बसू, सर्व प्रश्न मार्गी लागतील, असं जयंत पाटील म्हणाले.
भाजप उमेदवाराविरुद्ध चुलतभावाचा अर्ज, तब्बल 39 जण रिंगणात
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी थेट लढत होत असताना दोन्ही पक्षाच्या उमेदवारांसमोर एक मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आपला उमेदवार देऊन राष्ट्रवादीसमोर आव्हान उभं केलंय. तर दुसरीकडे भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या चुलत भावानेही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
पंढरपूरच्या रिंगणात भाजपनं समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं दिवंगत भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना मैदानात उतरवलं आहे. तर अन्य उमेदवार मिळून तब्बल 39 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अशा स्थितीत भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना बंडाचा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या उमेदवारीला घरातूनच विरोध होत असल्याचं पाहायला मिळतंय. समाधान आवताडे यांचे चुलत भाऊ सिद्धेश्वर आवताडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
पंढरपूरच्या भाजप पुरस्कृत नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले यांनीही भाजप विरोधात दंड थोपटले आहेत. भोसले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. या दोन उमेदवारांमुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचे नेते हे पक्षांतर्गत बंड कसं थंड करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
पंढरपूर मंगळवेढा पोट निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालकेंच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं. स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांच्या उमेदवारी अर्जासोबत आज स्वाभिमानी पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याद्वारे महाविकास आघाडीच्या विरोधात रणशिंग फुंकलं असल्याचं बोललं जात आहे. माजी खासदार राजू शेट्टी स्वाभिमानीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पंढरपुरात तळ ठोकून राहणार आहेत. ते गावोगावी जाऊन प्रचार सभाही घेणार आहेत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.




