फडणवीसांनी संन्यास घेतला, तर मराठी माणसाचा जाच संपेल : भास्कर जाधव

रत्नागिरी : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी यांनी चांगलाच समाचार घेतलाय. आमच्या हाती सूत्र द्या, चार महिन्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत नाही केलं तर राजकारणातून संन्यास घेईन, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यास घ्यावाच, त्यामुळे मराठी माणसाचा जाच तरी संपेल असा टोला भास्कर जाधव यांनी लगावलाय.
गेले दोन वर्षे राज्य सरकार कोरोना महामारीचा सामना करत आहे. अशातच फडणवीस फक्त त्रास देण्याचं काम करत आहेत. राजकारणात आतापर्यंत पाहिलं आहे की राज्यावर कोणतंही संकट आलं तर सर्वजण पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन एकत्र येतात आणि संकटांचा सामना करतात. मात्र, दोन वर्षात फडणवीस यांनी फक्त त्रास देण्याचं काम केलं आहे. त्यामुळे माझ्या मते त्यानी राजकारणातुन संन्यास घेतला तर मराठी माणसाचा जाच तरी संपले. त्यामुळे फडणवीस यांनी राजकीय संन्यास घ्यावाच, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय.
ओबीसी आरक्षण परत मिळावं, यासाठी भाजपने एल्गार केला होता. नागपूरमधल्या आंदोलनात फडणवीसांना ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. खास करुन त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. ओबीसी आरक्षणाचा मारेकरी काँग्रेसच आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. पण माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं फडणवीस म्हणाले होते.




