…’पद्मश्री’ परत करते, पण एका प्रश्नाचे उत्तर द्या; वादग्रस्त वक्तव्यावर कंगना ठाम
मुंबई: स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालं असं वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौतवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. कंगना राणौतला देण्यात आलेला पद्मश्री परत घेण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. यावर आता कंगनानं स्पष्टीकरण दिलं आहे. १९४७ मध्ये नेमकं काय झालं ते मला सांगितल्यास पद्मश्री पुरस्कार परत करेन, असं कंगनानं म्हटलं आहे.
१९४७ मध्ये भारताला मिळालेलं स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालं. देशाला खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये प्राप्त झालं, असं विधान कंगनानं केलं. या विधानाचा सर्वच स्तरातून निषेध झाला. आता कंगनानं इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली आहे. ‘त्या मुलाखतीत सगळ्या गोष्ट मी स्पष्टपणे म्हटल्या. १८५७ मध्ये स्वातंत्र्यासाठी पहिला संघटित संघर्ष झाला. सोबत सुभाष चंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई आणि वीर सावरकरांनी बलिदानावरही भाष्य केलं. १८५७ बद्दल मला माहीत आहे. पण १९४७ मध्ये कोणता लढा देण्यात आला त्याची मला माहिती नाही. जर कोणी माझ्या माहितीत भर घातली, तर मी पद्मश्री पुरस्कार परत करून माफी मागेन. कृपया माझी मदत करा, असं कंगनानं म्हटलं आहे.
कंगनानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमधून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मी राणी लक्ष्मीबाई सारख्या शहिदाच्या आयुष्यावर आधारित फीचर फिल्ममध्ये काम केलं आहे. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामावर बरंच संशोधन केलं. राष्ट्रवादासोबतच दक्षिणपंथाचाही उदय झाला. मग हा अचानक तो संपुष्टात कसा आला? गांधींनी भगतसिंगांना का मरू दिलं? नेता बोस यांची हत्या का झाली? त्यांना गांधींचा पाठिंबा मिळाला नाही. फाळणीची सीमा एका इंग्रजानं का आखली? स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्याऐवजी भारतीय एकमेकांच्या हत्या का करत होते? मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, असं कंगनानं स्टोरीमध्ये नमूद केलं आहे.