मुनगंटीवार अडचणीत; ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीसाठी सर्वपक्षीय १६ आमदारांची समिती जाहीर
मुंबई : तत्कालीन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारने राज्यात राबविलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडीची चौकशी विधिमंडळ सदस्यांच्या समितीमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी आज सर्वपक्षीय 16 आमदारांची समिती जाहीर करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री दत्तात्रय भरणे असणार आहेत.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. 33 कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीसाठी सर्वपक्षीय 16 आमदारांची समिती जाहीर करण्यात आली असून चार महिन्यांत या समितीने अहवाल द्यायचा आहे. या समितीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, नितेश राणे आदींचा समावेश आहे.
राज्यात राबविलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडीची चौकशी विधिमंडळ सदस्यांच्या समितीमार्फत करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात विधानसभेत केली होती. शिवसेनेचे रमेश कोरगावकर यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीसाठी विशेष मोहीम राबविण्याकरिता २०१६ ते २०२० या काळात वनविभागाला २ हजार ४२९ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला, तो पूर्णपणे वापरण्यात आला आहे. वनविभागाकडून २८.२७ कोटी वृक्ष लागवड करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२० अखेर त्यातील ७५.६३ टक्के झाडे जिवंत आहेत, असे वन राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले.
नाना पटोले यांचा हल्लाबोल
काँग्रेसचे वरिष्ठ सदस्य नाना पटोले यांनी, जवळपास २५ टक्के झाडे जगलेली नाहीत. अनेक ठिकाणी फक्त खड्डे खणले; पण लागवडच झाली नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. याकडे लक्ष वेधत विधिमंडळाच्या संयुक्ती समितीमार्फत या लागवडीची चौकशी करण्याची मागणी केली होती. ही वृक्षलागवड हे ईश्वरीय कार्य आहे, ही वृक्षलागवड एक जनचळवळ बनली, असे सांगत तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोहिमेचे यश अधोरेखित केले होते. चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जयकुमार गोरे, प्रकाश साळुंके, धर्मरावबाबा आत्राम यांनी भाग घेतला होता.