Top Newsराजकारण

निवडणुकीत विरोधकांना चितपट करणाऱ्या रोहित पाटलांना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी?

पुणे : नगर पंचायत निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या, तर सर्वाधिक २८ नगर पंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसनं वर्चस्व मिळवलं आहे. या सगळ्यात नगर पंचायत निवडणूक गाजवली ती दिवंगत माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटीलने. अवघ्या २३ वर्षाच्या या उमद्या पोरानं स्वकियांसह विरोधकांनाही धोबीपछाड देत कवठे-महाकाळ नगरपंचायत आपल्या ताब्यात मिळवली. त्यामुळे राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्यांच्या तोंडावर सध्या रोहित पाटील यांचंच नाव आहे. अशावेळी रोहित पाटील यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याचे संकेत आमदार रोहित पवार यांनी आज दिले आहेत.

रोहित पाटील यांचं कौतुक करताना रोहित पवार म्हणाले की, रोहित पाटीलसारखी मुलं विधानसभेत येणं गरजेचं आहे. त्यांचं वय कमी असेल त्यामुळे गेल्यावेळी त्यांना संधी दिली नसेल. मात्र, वय झालं की पक्ष नक्की विचार करेल, येत्या काळात पक्ष संधी देईल असा मला विश्वास आहे. रोहितला आता पक्षाचं पद किंवा जबाबदारी द्यायला हवी, असं मोठं आणि सूचक वक्तव्यही रोहित पवार यांनी यावेळी केलंय. त्याचबरोबर रोहित पाटील हा लोकांमधील युवा कार्यकर्ता आहे. रोहित पाटील जनतेत मिसळणारा कार्यकर्ता आहे. म्हणून त्यांच्यावर लोकांनी विश्वास टाकला, असंही रोहित पवार काल म्हणाले होते.

रोहित मन मिळावू कार्यकर्ता: अजितदादा

कवठेमहाकाळमध्ये सगळे एकीकडे आणि रोहित एकीकडे होता. रोहित विरुद्ध सर्व अशी लढाई होती. रोहितचं वक्तृत्व चांगलं आहे. त्याची कामाची पद्धत चांगली आहे. जमिनीवरचा नेता आहे. लोकांशी मिसळून वागतो. आर आर पाटलांचं रक्त त्याच्यात आहे. मनमिळावू स्वभाव आहे. त्यामुळे त्याच्यावर लोकांनी विश्वास टाकला. आता त्याने विकासकामे करावीत. त्याच्या प्रत्येक कामात आम्ही त्याला सहकार्य करू, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button