सचिन वाझेचा गॉडफादर कलानगरमध्ये आहे का?; आ. नितेश राणेंचा सवाल
मुंबई: शिवसेनेच्या अटक झालेल्या आणि चौकशी होत असलेल्या नेत्यांची नावे मनसुख हिरेन प्रकरणाशी कशी जोडली जातात? सचिन वाझेंचे गॉडफादर कलानगरमध्ये बसलेले आहेत काय?, असा सवाल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
नितेश राणे यांनी एका वृत्तवाहिनीशी मराठीशी बोलताना हा सवाल केला आहे. अटक होणाऱ्या किंवा चौकशी होणाऱ्या सर्वच शिवसेना नेत्यांची नावे मनसुख हिरेन प्रकरणाशी कशी जोडली जात आहेत. या सगळ्यांमध्ये शिवसेना हीच कॉमन लिंक आहे. २०१९ मध्ये एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेतून विधानसभा लढवली आहे. मूळ मुद्दा एवढाच आहे की या सर्व प्रकरणाशी शिवसेनेची लिंक काय आहे? वाझेचे गॉडफादर कलानगरला बसले आहेत काय?, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.
सगळ्या संशयाच्या सुया एकाच दिशेनं जात आहेत. या मागचा मास्टरमाईंड कलानगरला बसला आहे. एनआयएने डायरेक्ट कलानगरमधून चौकशी सुरू करावी. कलानगरात मनसुखचे मुख्य आरोपी आहे. तिथेच हेड क्वॉर्टर आहे, असा दावाही त्यांनी केला. अनिल परब हे वाझेचे बॉस आहेत. ते वाझेसाठी अधिवेशनात भांडत होते. मुख्यमंत्रीही त्याची बाजू घेत होते. वाझे काय लादेन आहे का? असं मुख्यमंत्री म्हणत होते. हिरेन प्रकरणी एनआयए काम करत आहे. अधिवेशनात आम्हाला काय करायचं ते करूच. ज्या गोष्टी करणं गरजेच्या आहेत, त्या करणारच, असं त्यांनी स्पष्ट केलं.
शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना भवनासमोर जुंपली होती. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता प्रसाद दिलाय, पुढे शिवभोजन थाळी देऊ, असा इशारा भाजपला दिला आहे. त्यावरही राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवप्रसाद देणाऱ्यांनी कधी घराबाहेरही यावं. नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा संजय राऊतांची अवस्था काय झाली होती हे सांगायला नको. राऊतांनी शिवभोजनाची भाषा करू नये. मैदानात यावं. राऊत दोन पायांवर जाणार नाहीत हे मी ठामपणे सांगतो, असा इशाराही त्यांनी दिला.
मराठा समाज असो, ओबीसी असो की धनगर समाज असो. सर्वांना सरकारने नाराज केलं आहे. ओबीसींचं आरक्षण उडवून लावलं आहे. या सगळ्या गोष्टी अति होत चालल्या आहेत. मंत्र्यांच्या गाड्या फुटतील तेव्हा समाज किती नाराज आहे हे कळेल, असा इशाराही त्यांनी दिला.