Top Newsराजकारण

अफगाणिस्तानातून सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय योग्यच : बायडन

देशाला गरज असताना अश्रफ घनींनी पळ काढल्याचा आरोप

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सोमवारी रात्री उशिरा अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा आणि अमेरिकन सैन्य बाहेर काढण्याच्या मुद्द्यावर देशाला संबोधित केले. अफगाण नेतृत्वावर खापर फोडत बायडन म्हणाले की, अफगाणी नेते आपल्या लोकांच्या भल्यासाठी एकत्र येण्यात अपयशी ठरले आहेत. जेव्हा सर्वात जास्त गरज होती तेव्हा ते आपल्या भविष्यासाठी उभा राहू शकले नाहीत. बायडन म्हणाले की, अमेरिकेचं अफगाणिस्तानमधील युद्ध संपवण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल मला कोणताही खेद नाही.

बायडन पुढे म्हणाले, मला माहित आहे की या निर्णयामुळे माझ्यावर टीका केली जाईल, परंतु मी सर्व टीका स्वीकारतो. मी ती पुढच्या अध्यक्षांवर सोडू शकत नव्हतो. अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याची योग्य वेळ कधीच आली नसती. हे चार अध्यक्षांच्या कार्यकाळात चालत राहिलं आणि मी ते पाचव्यासाठी सोडू शकत नव्हतो. आपण आपल्या सैनिकांना अनंत काळासाठी दुसर्‍या देशाच्या नागरी संघर्षात ढकलू शकत नाही. आम्हाला हा निर्णय घ्यावाच लागणार होता.

राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात जो बायडन यांनी पुल आउट डीलसाठी माजी अध्यक्ष ट्रम्प यांना दोषी ठरवले. ते पुढे म्हणाले, जर अफगणाचं सैन्य लढायला तयार नसेल तर अमेरिकींनाही तिथे आपला जीव गमावण्याची गरज नाही. आवश्यक असल्यास, आम्ही अफगाणिस्तानमधील दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करू.

बायडेन म्हणाले, की २० वर्षांपूर्वी आम्ही ११ सप्टेंबर २००१ च्या हल्लेखोरांना पकडण्याच्या उद्देशानं आम्ही अफगाणिस्तानात आलो. अफगाणिस्तानला तळ बनवून अल कायदा पुन्हा आपल्यावर हल्ला करू शकणार नाही याचीही आम्हाला खात्री करायची होती. आम्ही आमचे ध्येय साध्य करण्यात पूर्णपणे यशस्वी झालो आहोत. आम्ही अफगाणिस्तानातील अल कायदा नष्ट केला. आम्ही ओसामा बिन लादेनला शोधून मारले.

अमेरिकेवर टीका

क्रूरकर्मा तालिबान्यांनी केवळ अफगाण सरकारलाच गुडघे टेकायला लावले नाहीत. तर अमेरिकेसारख्या बलाढ्य देशालाही नाक घासायला लावलं आहे. स्वतःच्याच नागरिकांना वाचवण्यासाठी, त्यांना मायदेशी नेण्यासाठी तालिबान्यांच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ अमेरिका आणि ब्रिटनसारख्या महासत्तांवर आली आहे. काबूलच्या अमेरिकन दुतावासातून अमेरिकन झेंडा हटवण्यात आला आहे. सगळ्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेत नेण्याची तयारी सुरूय. त्यासाठी १ हजार अमेरिकन सैनिकांना तातडीनं अफगाणिस्तानात पाठवण्यात आलं आहे. अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ गनी देश सोडून पळून गेले. त्यामुळं जो बायडन सरकारच्या धोरणांवर टीकेची झोड उठली आहे. ही केवळ अफगाणिस्तानची नव्हे, तर अमेरिकेचीही हार असल्याचं मानलं जातं आहे.

अफगाणिस्तानात अमेरिकेचे तब्बल ३ लाख सैनिक होते. परंतु केवळ ८० हजार तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतला. कोणतीही लढाई न करताच अमेरिकेनं आत्मसमर्पण केल्याची टीका आता अमेरिकेवर होत आहे. तालिबान्यांशी दोहा करार करून अफगाणिस्तान सोडणं ही अमेरिकेची चूक होती, असा भडीमार ब्रिटीश संरक्षणमंत्री बेन वालेस यांनी केलाय.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट बायडन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अफगाणिस्तान युद्धावर अब्जावधी रूपये खर्च करून आणि सैनिकांचा जीव घालवून अमेरिकेनं खरंच काय मिळवलं, हा मोठा प्रश्नच आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button