नवी दिल्ली : भाजपला रोखण्यासाठी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात संपुआ (यूपीए) स्थापन झाली, पण बदलत्या काळात अनेक घटक संपुआला सोडून गेले तर काँग्रेसही रसातळाला चालली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे विशेषतः राहुल गांधींचे नेतृत्व स्वीकारण्यास विरोधी पक्ष तयार नसल्याचे चित्र राजधानीत आहे. ही चिंता भेडसावत असल्यानेच काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपली पक्षाची तातडीची बैठक गुरुवारी बोलावली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत विरोधी पक्षांच्या होणाऱ्या बैठकीत काँग्रेसला फारसे महत्त्व मिळणार नाही, याचे संकेत सोनिया गांधी यांना मिळाले आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए स्थापन झाली. मात्र, बिगरभाजप पक्षांची तिसरी आघाडी स्थापन झाली तर तिचे नेतृत्व काँग्रेसकडे येणार नाही, हे स्पष्ट आहे. बिगरभाजप पक्षांना राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य नसणे हा काँग्रेससाठी सर्वात मोठा अडथळा आहे. त्यामुळेच काँग्रेसला संभाव्य तिसऱ्या आघाडीपासून लांब ठेवण्याचे काही पक्षांचे प्रयत्न आहेत.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब आदी राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका यांच्याबाबत काय रणनीती असावी, याविषयी काँग्रेस नेते गुरुवारच्या बैठकीत चर्चा करतील. बिगरभाजप पक्षांची तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांना जशास तसे उत्तर देण्यासाठी काँग्रेसने राज्यस्तरावर प्रादेशिक पक्षांशी युती करावी का यावरही या बैठकीत चर्चा होईल, असे सूत्रांनी सांगितले. याशिवाय अन्य महत्वाच्या विषयांवरही या बैठकीत चर्चा हाेणार आहे.