राजकारण

सावरकर खरे देशभक्त, शंका घेणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे; अमित शाहांचे प्रत्युत्तर

पोर्ट ब्लेअर: गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल विविध स्तरांतून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. आरोप-प्रत्यारोपही केले जात आहेत. काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यापासून ते प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यापर्यंत अनेकांनी सावरकर आणि त्यांच्याबद्दल केल्या जाणाऱ्या दाव्यांबाबत भाष्य केले आहे. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले असून, सावरकर खरे देशभक्त होते. त्यांच्या त्याग आणि शौर्याबाबत शंका उपस्थित करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, असा पलटवार केला आहे.

अमित शाह तीन दिवसांच्या अंदमान-निकोबर दौऱ्यावर असून, राष्ट्रीय स्मारक सेल्युलर कारागृहास भेट देऊन हुतात्मा स्तंभ येथे पुष्पचक्र अर्पण केले. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी बंदीवास भोगलेल्या कोठडीस भेट देऊन सावरकरांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोलताना अमित शाह यांनी विरोधकांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची देशभक्ती आणि त्यांचा त्याग, शौर्य याबद्दल शंका घेता येणार नाही आणि जे त्याबद्दल प्रश्न उपस्थित करतात त्यांना त्याची थोडी तरी लाज वाटली पाहिजे. सावरकरांना वीर ही उपाधी कोणत्याही सरकारने दिलेली नाही, तर देशातील १३० कोटी लोकांनी त्यांना ती त्यांच्या देशप्रेम, शौर्याबद्दल बहाल केली आहे, या शब्दांत अमित शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

ज्यांनी देशासाठी कारावास भोगताना कोलूवर पशुवत यातना भोगत अपार घाम गाळला, ज्यांना दोन जन्मठेपा सुनावण्यात आल्या, त्यांची निष्ठा, त्यागाबद्दल तुम्ही शंका कशी घेऊ शकता, थोडी तरी लाज बाळगा, असा हल्ला अमित शाह यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल शंका उपस्थित करणाऱ्यांवर चढविला.

दरम्यान, ब्रिटिशांनी बांधलेले हे सेल्युलर जेल देशातील लोकांसाठी सर्वांत मोठे तीर्थक्षेत्र आहे. म्हणूनच सावरकर म्हणायचे की तीर्थक्षेत्रांमध्ये हे एक महान तीर्थ आहे, जिथे अनेक लोकांनी स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी बलिदान दिले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीत जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. हा माझ्यासारख्या व्यक्तीसाठी हा भावनिक क्षण होता. येथे येऊन देशभक्तीची भावना आणखी प्रचंड आणि तीव्र होते, असे अमित शाह यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button